सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 शहर

मध्यरात्री चेंबरमध्ये उतरले अन् काळाचा घाला; दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू, निगडीतील घटनेने संताप

डिजिटल पुणे    27-08-2026 13:01:18

पिंपरी-चिंचवड : निगडी प्राधिकरण परिसरातील लोकमान्य हॉस्पिटलजवळ बुधवारी (ता. २६) मध्यरात्रीच्या सुमारास चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. रात्री सुमारे १२ वाजता दोन्ही कामगार चेंबरमध्ये अडकल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत दोन्ही कामगारांना चेंबरमधून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

विषारी वायूमुळे गुदमरल्याचा प्राथमिक अंदाज

चेंबरमध्ये उतरल्यानंतर विषारी वायूचा प्रादुर्भाव झाल्याने दोन्ही कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, रात्रीच्या वेळी चेंबरमध्ये कोणते काम सुरू होते, कामगारांना चेंबरमध्ये उतरण्यापूर्वी आवश्यक सुरक्षा उपाय देण्यात आले होते का आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोणती साधने उपलब्ध होती, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मागील दुर्घटनेनंतरही पुन्हा घटना; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

निगडी प्राधिकरण परिसरात गेल्या वर्षीही चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत ठोस पावले उचलली गेली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्याच परिसरात पुन्हा अशाच स्वरूपाची दुर्घटना घडल्याने महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नागरिकांमध्ये तीव्र संताप

वारंवार अशा दुर्घटना घडत असूनही कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. चेंबरमध्ये काम करणाऱ्या कामगारांना आवश्यक सुरक्षा उपकरणे आणि संरक्षणात्मक साधने उपलब्ध करून देण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेचा पोलीस सखोल तपास करत आहेत. मृत कामगारांची ओळख पटवण्यासह त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. चेंबरमध्ये नेमके कोणते काम सुरू होते, कामगारांना कोणाच्या आदेशाने चेंबरमध्ये उतरवण्यात आले आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, यासह विविध बाबींची चौकशी केली जात आहे. वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती