नेपाळ : नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला आहे. अनेक इमारती, रस्ते, पूल आणि संपूर्ण गावं पुराच्या पाण्यात वाहून गेली. या दुर्घटनेत 165 जणांचा मृत्यू झाला असून, एक हजारहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती आहे. दरम्यान, या महापुरामागे नेमकं कारण काय, याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तज्ज्ञ विश्लेषणानुसार, हा जलप्रलय थेट भूकंपामुळे झालेला नसून उंच पर्वतीय भागातील ग्लेशियरचा मोठा तुकडा कोसळल्याने निर्माण झालेल्या घटनांची साखळी यामागे असल्याचे दिसून येत आहे. मात्र, चीनने या घटनेमागे नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचा संबंध असल्याचे म्हटले आहे.
ग्लेशियरचा तुकडा तब्बल 1200 मीटर खाली कोसळला
लॅंगटांग लिरुंग पर्वताच्या उत्तरेकडील उतारावर सुमारे 5,200 मीटर उंचीवर असलेल्या ग्लेशियरचा खालचा भाग अचानक तुटला. हा बर्फ आणि दगडांचा मोठा भाग तब्बल 1,200 मीटर खाली दरीत कोसळला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर बर्फ, दगड आणि मलबा ल्हेंदे खोला नदीत जाऊन पडला.
मलब्यामुळे नदीचा प्रवाह काही काळासाठी अडला आणि तिथे नैसर्गिक स्वरूपाचा तात्पुरता बांध तयार झाला. हा बांध तुटताच पाणी, चिखल, दगड आणि मलब्याची प्रचंड लाट वेगाने खालच्या दिशेने वाहू लागली. काही वेळातच या घटनेने भीषण पुराचे रूप घेतले.
काही मिनिटांत नद्यांची पाणीपातळी वाढली
ल्हेंदे खोलामधून आलेला हा प्रचंड मलबा आणि पाण्याचा प्रवाह भोटेकोशी नदीत पोहोचला. तिमुरे परिसरातून पुढे गेलेले पाणी भोटेकोशी नदीच्या प्रवाहासोबत वाहत गेले. पुढे ही नदी त्रिशूली नदीला मिळत असल्याने पुराचा परिणाम मोठ्या परिसरात जाणवला.नुवाकोट आणि धादिंगसह खालच्या भागांमध्येही पुराचे पाणी पोहोचले. काही ठिकाणी त्रिशूली नदीची पाणीपातळी अवघ्या 30 मिनिटांत तब्बल 7 ते 9 मीटरने वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
चीनचा दावा काय?
नेपाळमधील चीनचे राजदूत झांग माओमिंग यांनी एका नेपाळी वृत्तवाहिनीशी बोलताना या दुर्घटनेबाबत वेगळी शक्यता मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, नेपाळच्या बाजूला भूकंप झाला. त्यानंतर हिमस्खलन आणि पुढे भूस्खलन झाल्याने रसुवागढी सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.चीनने या घटनेत नेपाळ आणि चीन या दोन्ही बाजूंना मोठी जीवितहानी झाल्याचे सांगितले असून, बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
सॅटेलाइट छायाचित्रांतूनही महत्त्वाचे संकेत
प्लॅनेट लॅब्सने पुरापूर्वी आणि पुरानंतरची सॅटेलाइट छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या छायाचित्रांच्या प्राथमिक विश्लेषणातून रसुवागढी बॉर्डर क्रॉसिंगपासून सुमारे 20 किलोमीटर ईशान्येला बर्फ आणि दगडांचे मोठे भूस्खलन झाल्याचे संकेत मिळाले आहेत.नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) देखील या प्राथमिक विश्लेषणाचा संदर्भ देत ल्हेंदे नदीत ग्लेशियरशी संबंधित पूर निर्माण झाल्याचे म्हटले आहे.
ग्लेशियर कोसळला आणि काही मिनिटांत जलप्रलय
एकूणच, उंच पर्वतीय भागात ग्लेशियरचा तुकडा कोसळणे, त्यातून नदीचा प्रवाह अडणे आणि त्यानंतर तयार झालेला तात्पुरता बांध फुटणे, या घटनांच्या मालिकेमुळे नेपाळमध्ये हा भीषण जलप्रलय आल्याचे प्राथमिक चित्र आहे. त्यामुळे ही दुर्घटना नेमकी भूकंपामुळे झाली की ग्लेशियर आणि भूस्खलनाच्या संयुक्त परिणामातून, याचा अधिकृत तपास महत्त्वाचा ठरणार आहे.