सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 विश्लेषण

नेपाळवर पुन्हा महाप्रलयाचं संकट; जलाशय फुटण्याचा धोका, चीनचा गंभीर इशारा

डिजिटल पुणे    27-08-2026 18:23:49

काठमांडू : नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. आतापर्यंत २८९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, सुमारे १,५०० नागरिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच आता नेपाळसमोर आणखी एका मोठ्या संकटाची शक्यता निर्माण झाली आहे. चीनने जलाशय फुटण्याचा धोका व्यक्त करत पुढील तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे.

जलाशयात २० लाख घनमीटर पाणी; धोका वाढला

भोटेकोशी नदीच्या अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळमधील तीन जिल्ह्यांमध्ये मोठा विध्वंस झाला. या पार्श्वभूमीवर चीनच्या जलसंपदा मंत्रालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे. चोचेन खोला आणि पुरपू त्सांगपो नद्यांच्या संगमाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचून नैसर्गिक जलाशय तयार झाला आहे.

गुरुवारी सकाळपर्यंत या जलाशयात अंदाजे २० लाख घनमीटर पाणी जमा झाले होते. विशेष म्हणजे, हा जलाशय ओसंडून वाहत असल्याचेही सांगण्यात आले आहे. पुढील तीन दिवसांत आणखी सुमारे ३० लाख घनमीटर पाणी या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलाशय फुटल्यास मोठा पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जयशंकर यांची तातडीची आढावा बैठक

नेपाळमधील गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीला परराष्ट्र सचिव, परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी तसेच काठमांडू आणि बीजिंगमधील भारतीय राजदूत सहभागी झाले.

नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता, मदतकार्य आणि बचाव मोहिमेबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. भारतीय अधिकारी नेपाळ सरकार, विविध मंत्रालये, राज्य सरकारे, टूर ऑपरेटर आणि प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून मदतकार्याला वेग देण्यात येत आहे.

तिमुरे गावाला सर्वाधिक फटका

२६ ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये आलेल्या अचानक महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. भोटेकोशी नदीची उपनदी असलेल्या ल्हेंडे नदीचा प्रवाह हिमस्खलनामुळे अडल्याने पूरस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.नेपाळ-चीन सीमेवरील रसुवागढी परिसरातील तिमुरे गावाला या आपत्तीचा सुरुवातीला मोठा फटका बसला. विशेष म्हणजे, परिसरात पाऊस नसतानाही अचानक पूर आल्याने स्थानिकांना परिस्थितीची कल्पना आली नाही. त्यामुळे दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असलेल्या नागरिकांना बचावासाठी वेळ मिळाला नाही.

भारताकडून मदतीची दुसरी मोठी खेप रवाना

नेपाळमधील मदत आणि बचाव कार्यासाठी भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. बुधवारी १० टन अन्नधान्याची पहिली खेप पाठवल्यानंतर गुरुवारी भारताने आणखी ३७.५ टन मदत सामग्री नेपाळकडे रवाना केली.भारताकडून नेपाळ सरकार आणि स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून मदतकार्य सुरू ठेवण्यात येत आहे.

अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन जारी

नेपाळमध्ये अडकलेले भारतीय नागरिक किंवा त्यांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.

हेल्पलाइन : 011-26772005

व्हॉट्सॲप : 9818963273

ई-मेल : [email protected]

नेपाळमधील पूरस्थिती पाहता पुढील काही दिवस प्रशासन आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. चीनच्या इशाऱ्यानंतर संभाव्य जलाशय फुटीच्या धोक्यावरही प्रशासनाचे लक्ष केंद्रित झाले आहे.


 Give Feedback



 जाहिराती