मुंबई : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे गंभीर परिणाम समोर आले आहेत. दरवाजात उभे राहण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाला सहप्रवाशाने लाथ मारल्याची धक्कादायक घटना घडली. लाथ बसल्याने तरुण धावत्या लोकलमधून खाली पडून गंभीर जखमी झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना २५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.४१ वाजता गोरेगावहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये घडली. कांदिवली स्थानकातून लोकलमध्ये चढलेल्या राहुलकुमार पांडे (३०) याचा तौसिफ शेख (२४) याच्यासोबत वाद झाला.
बोरिवली स्थानकाजवळ तौसिफने राहुलकुमारला लोकलच्या दरवाजातून आत सरकण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. काही वेळातच या वादाचे रूपांतर झटापटीत झाले. त्यानंतर राहुलकुमारने तौसिफच्या पाठीवर जोरदार लाथ मारल्याने तो धावत्या लोकलमधून खाली पडला.
या घटनेत तौसिफ गंभीर जखमी झाला. रेल्वे पोलिसांनी त्याला तातडीने प्रथमोपचारासाठी नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कांदिवलीतील डॉ. आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तौसिफच्या डोक्याला टाके पडले असून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तौसिफ नालासोपारा येथे राहत असून कारपेंटर म्हणून काम करतो.
आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तपास सुरू करून राहुलकुमार पांडे याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने थेट तरुणाचा जीव धोक्यात आल्याने या घटनेने मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
लोकलमधील वाद हिंसक होण्याच्या घटनांमध्ये वाढ?
मुंबई लोकलमध्ये दरवाजात उभे राहणे, सीटवरून वाद किंवा डब्यातील जागेवरून होणारे किरकोळ वाद अनेकदा गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे अलीकडील घटनांमधून समोर आले आहे.२० ऑगस्ट रोजी वांद्रे-माहीमदरम्यान चर्चगेट-बोरिवली लोकलमध्ये एका ६२ वर्षीय दिव्यांग प्रवाशाला धावत्या ट्रेनमधून बाहेर ढकलण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला होता. दिव्यांगांसाठी राखीव डब्यातील जागेवरून हा वाद झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणातील आरोपीला सहप्रवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.तसेच ८ ऑगस्ट रोजी सीटवरून झालेल्या वादात एका महिलेला हाताने तसेच बेल्टने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी मोहम्मद रिझवान अन्सारी याला अटक करण्यात आली होती.किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला होण्याच्या घटनांमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.