सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
  • माणुसकीला काळीमा फासणारी घटना; नेपाळमध्ये पुराच्या पाण्यातील महिलेच्या मृतदेहावरील सोनं दोघांनी चोरलं, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून तातडीने कारवाई
  • नेपाळच्या महापुरात पुण्याचे ४ पर्यटक अडकले; ट्रॅव्हल कंपनीने साथ सोडल्याचा तरुणीचा आरोप, सरकारकडे मदतीची आर्त हाक
 विश्लेषण

नेपाळच्या महापुरात ३२० भारतीय बेपत्ता; चीनमध्ये अडकलेले ४०० नागरिक सुरक्षित, MEA कडून मोठं अपडेट

डिजिटल पुणे    28-08-2026 18:57:23

नवी दिल्ली : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली असून अनेक भारतीय नागरिकांशी संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये सध्या ३२० भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. याशिवाय सुमारे १०० भारतीय वंशाच्या व्यक्तींशीही संपर्क तुटला असून, त्यापैकी काही जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले असण्याची शक्यता आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पूरग्रस्त भागातून काठमांडूमध्ये पोहोचलेले २१ भारतीय नागरिक आता सुरक्षितपणे दिल्लीला दाखल झाले आहेत. हे सर्व नागरिक तामिळनाडूचे असून, काठमांडूमध्ये भारतीय राजदूतांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

याशिवाय त्रिशुली-१ जलविद्युत प्रकल्पात काम करणाऱ्या ६३ भारतीय नागरिकांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. चीनच्या बाजूला अडकलेल्या आणखी ९६ भारतीय नागरिकांनीही जमिनीच्या मार्गाने सुरक्षितपणे नेपाळमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

चीनमध्ये ४०० भारतीय नागरिक सुरक्षित

दरम्यान, चीनच्या बाजूने तिबेट प्रदेशात सुमारे ४०० भारतीय नागरिक अडकले असून ते सर्व सुरक्षित आहेत. हे नागरिक आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. बीजिंगमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून, या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या सुमारे १०० भारतीय वंशाच्या व्यक्तींशी संपर्क होऊ शकलेला नाही. यातील काही जणांकडे भारताचे नागरिकत्व नसून इतर देशांचे नागरिकत्व असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

MEA चा २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाचा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहे. चीनमधील भारतीय दूतावासही परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले जात आहेत.

भारताकडून नेपाळला मोठ्या प्रमाणात मदत

नेपाळमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर भारताने तातडीने मानवतावादी मदत सुरू केली. २६ ऑगस्टच्या संध्याकाळी पहिले मदत विमान रवाना करण्यात आले. या विमानातून तात्पुरती निवारागृहे, ब्लँकेट्स, स्वच्छता किट, सौर दिवे आणि औषधांसह सुमारे १० टन मदत साहित्य पाठवण्यात आले.

त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी सकाळी दुसरे विमान रवाना करण्यात आले. या विमानातून तंबू, ब्लँकेट्स, स्वच्छता किट, सौर दिवे, पाण्याचे पंप, किचन सेट, जनरेटर, औषधे आणि खाद्यपदार्थांसह तब्बल ३७.५ टन मदत साहित्य नेपाळला पाठवण्यात आले.

बोगदा बचाव पथक आणि वैद्यकीय टीमही पाठवणार

नेपाळ सरकारच्या विनंतीनुसार भारताकडून बोगदा बचाव पथक पाठवण्याची तयारी सुरू आहे. बचावकार्याची गरज आणि आवश्यक उपकरणांचा आढावा घेण्यासाठी प्राथमिक पथक पाठवण्यात येणार आहे.याशिवाय पूरग्रस्त भागातील नागरिकांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी भारतीय वैद्यकीय पथकही नेपाळमध्ये पाठवले जाणार आहे. बाधित भागांमध्ये संपर्क व्यवस्था लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी भारताने बेली ब्रिज आणि तांत्रिक पथके पाठवण्याचा प्रस्तावही नेपाळसमोर ठेवला आहे.दरम्यान, बेपत्ता भारतीय नागरिकांचा शोध, सुरक्षित नागरिकांची सुटका आणि नेपाळमधील मदतकार्य यासाठी भारताकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.


 Give Feedback



 जाहिराती