सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
  • माणुसकीला काळीमा फासणारी घटना; नेपाळमध्ये पुराच्या पाण्यातील महिलेच्या मृतदेहावरील सोनं दोघांनी चोरलं, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून तातडीने कारवाई
  • नेपाळच्या महापुरात पुण्याचे ४ पर्यटक अडकले; ट्रॅव्हल कंपनीने साथ सोडल्याचा तरुणीचा आरोप, सरकारकडे मदतीची आर्त हाक
 विश्लेषण

नेपाळच्या महापुराचा कहर! बेवारस मृतदेहांचे सामूहिक दफन; ३ हजारांहून अधिक जण अद्याप बेपत्ता

डिजिटल पुणे    31-08-2026 11:39:54

काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली असून, परिस्थिती अद्याप गंभीर आहे. पुरात मृत्युमुखी पडलेल्या आणि अद्याप ओळख पटू न शकलेल्या मृतदेहांचे आता सामूहिक दफन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. चितवनमधील देवघाट जंगल परिसरात प्रशासनाकडून शेकडो कबरी तयार करण्यात आल्या आहेत.

ओळख पटत नसलेल्या मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार

पुराच्या पाण्यात सापडलेले अनेक मृतदेह दीर्घकाळ पाण्यात राहिल्याने खराब झाले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल १९६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मृतदेहांची ओळख भविष्यात पटवता यावी, यासाठी प्रत्येक मृतदेहाला स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यात येत आहे. त्यासोबत आवश्यक नोंदी आणि नमुने जतन केले जात आहेत. पुढील काळात डीएनए चाचणीच्या माध्यमातून मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

३ हजारांहून अधिक नागरिकांचा अद्याप शोध नाही

या नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक बेपत्ता झाले आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, ३ हजारांहून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांकडून आपल्या नातेवाईकांचा शोध सुरू असून, अनेक कुटुंबे अद्याप त्यांच्या प्रियजनांच्या परतीची वाट पाहत आहेत.

हिमनदी फुटल्याने नद्यांना अचानक पूर

२६ ऑगस्ट रोजी तिबेटमध्ये हिमनदी फुटल्याने नेपाळमधील भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. त्यानंतर आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. या दुर्घटनेत नेपाळमध्ये आतापर्यंत ९०४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर तिबेटमध्ये मृतांचा आकडा १६ वर पोहोचला आहे.या घटनेपूर्वी हिमनदीच्या संभाव्य धोक्याची माहिती चीनकडून नेपाळला देण्यात आली होती का, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

चीनकडून पुरेशी माहिती मिळाली नसल्याचा दावा

२७ मे रोजी नेपाळ आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली होती. त्यावेळी नेपाळी अधिकाऱ्यांनी हिमनदीतील हालचाली तसेच पाण्याच्या पातळीतील बदलांविषयी आगाऊ माहिती देण्याची मागणी केल्याचे सांगितले जाते. मात्र, नेपाळी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चीनकडून अपेक्षित माहिती त्यांना मिळाली नाही.

नेपाळ-चीनमधील प्रमुख व्यापारी मार्गाला मोठा फटका

पुराच्या तडाख्यामुळे नेपाळ आणि चीनदरम्यानच्या व्यापारासाठी महत्त्वाचा असलेला रसुवागढी-केरुंग सीमा मार्ग मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाला आहे. सीमा चौकी, दोन्ही देशांना जोडणारा मैत्री पूल तसेच तिमुरे परिसराचे मोठे नुकसान झाले आहे.चीनमधून नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे हा मार्ग बंद पडल्याने व्यापारी वाहतूक ठप्प झाली असून, व्यापाऱ्यांसमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.

९० टक्के बाधित भागात वीजपुरवठा सुरळीत

पूर ओसरल्यानंतर प्रशासनाकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नुवाकोटमधील सुमारे ९० टक्के बाधित भागांमध्ये वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. रसुवा जिल्ह्यातही वीज व्यवस्था पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

सौरऊर्जेच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था

वीजपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाने पर्यायी ऊर्जेचा आधार घेतला आहे. बाधित भागांमध्ये २ किलोवॅट क्षमतेच्या संस्थात्मक सौर प्रणाली तसेच २० वॅट क्षमतेचे ५०० सौर संच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हे सौर संच बाधित भागांतील नागरिकांपर्यंत दुसऱ्याच दिवशी पोहोचवण्यात आले.दरम्यान, बेपत्ता नागरिकांचा शोध, मृतदेहांची ओळख पटवणे, वीजपुरवठा सुरळीत करणे आणि उद्ध्वस्त झालेल्या पायाभूत सुविधा पुन्हा उभारणे, अशी अनेक आव्हाने नेपाळ प्रशासनासमोर उभी आहेत.


 Give Feedback



 जाहिराती