पुणे : सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या पाहणीदरम्यान कार्यालयातील नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरून अमित ठाकरे आणि महाविद्यालय प्रशासनात चर्चा झाली.
अमित ठाकरे यांनी महाविद्यालयाच्या कँटिनमधील जेवणाचा दर्जा, तसेच स्पोर्ट्स कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षक उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावर महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांकडे विचारणा केली. यावेळी एका विद्यार्थ्याने कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यानंतर अमित ठाकरे यांनी, “शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी नरेंद्र मोदींचा फोटो कशासाठी?” असा सवाल मुख्याध्यापकांना केल्याचे समोर आले. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो तेथून खाली उतरवला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, अमित ठाकरे पुण्यातील एकूण सात महाविद्यालयांना भेट देऊन ‘Gen Z’ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, विविध समस्या आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित विविध उपक्रमही या दौऱ्यात आयोजित करण्यात आले आहेत.
यामध्ये ‘शैक्षणिक भ्रष्टाचार दहीहंडी’, विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी ‘रक्षाबंधन’, तसेच वाडिया महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांसमोर सुरू असलेल्या सिगारेट आणि गुटखा विक्रीविरोधात कारवाईची मागणी यांचा समावेश आहे. याशिवाय माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात येणार आहे.
‘अमित ठाकरेंना प्रोटोकॉल माहिती नसेल’
या घटनेवर भाजपकडूनही प्रतिक्रिया समोर आली आहे. पुणे महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी अमित ठाकरे यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.“तो फोटो नरेंद्र मोदींचा नसून भारताच्या पंतप्रधानांचा फोटो आहे. प्रोटोकॉलनुसार शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो लावले जातात. कदाचित अमित ठाकरेंना हा प्रोटोकॉल माहिती नसावा किंवा ते देशाच्या पंतप्रधानांना मानत नसावेत. त्यांच्या या कृत्याचा मी निषेध करतो,” अशी प्रतिक्रिया गणेश बीडकर यांनी दिली.
“पंतप्रधान हे घटनात्मक पद आहे. ते कोणत्याही एका पक्षाचे नसतात, तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान असतात,” असेही बीडकर यांनी स्पष्ट केले.दरम्यान, अमित ठाकरे यांच्या महाविद्यालय भेटीदरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, या मुद्द्यावर मनसे आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होण्याची चिन्हे आहेत.