काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे अनेक इमारती, रस्ते, पूल आणि गावांचे मोठे नुकसान झाले. याच पुराचा फटका नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशूली परिसरातील कृषी विकास बँकेच्या शाखेलाही बसला. बँकेच्या संपूर्ण परिसरात पुराचे पाणी आणि चिखल शिरल्यानंतर लॉकरमध्ये ठेवलेली कोट्यवधी रुपयांची संपत्ती सुरक्षित बाहेर काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते.
बँकेतून सापडला कोट्यवधींचा खजिना
पूर ओसरल्यानंतर बचाव पथकाने बँकेत शोधमोहीम सुरू केली. तब्बल ८ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुमारे ५० कोटी नेपाळी रुपये किमतीचे सोने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. याशिवाय जवळपास दीड कोटी नेपाळी रुपयांची रोकड, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूही पथकाच्या हाती लागल्या.
बँकेतील महत्त्वाची कागदपत्रेही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली. पाणी, चिखल आणि खराब झालेल्या परिसरामुळे बँकेच्या आतील भागात जाणे अत्यंत धोकादायक होते. मात्र, पोलीस आणि बचाव पथकाने परिस्थितीची पर्वा न करता एक-एक करून मौल्यवान वस्तू बाहेर काढल्या.
पुराच्या तडाख्याने बँक परिसर उद्ध्वस्त
भोटेकोशी नदीच्या पुराच्या पाण्याने त्रिशूली परिसरात मोठे नुकसान केले. रस्ते जलमय झाल्याने तसेच मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने बचावकार्यही कठीण झाले होते. बँकेपर्यंत पोहोचणे आणि त्यानंतर लॉकर तसेच इतर भागांमध्ये शोध घेणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरले.दीर्घकाळ चाललेल्या मोहिमेनंतर बँकेत ठेवलेली कोट्यवधींची संपत्ती सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. त्यामुळे बँक प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
नेपाळमध्ये मृतांचा आकडा ७८१ वर
दरम्यान, नेपाळमध्ये सुरू असलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत ७८१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान बालेन शाह यांनी मदत आणि बचावकार्याची माहिती देताना परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक असल्याचे सांगितले.
सरकारच्या माहितीनुसार, आतापर्यंत ९,४३५ नागरिकांना हवाई आणि रस्ते मार्गाने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मदत व बचावकार्यासाठी एकूण ३९४ उड्डाणे करण्यात आली असून, प्रभावित भागांमध्ये नेपाळी लष्कर, पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाचे २०,६१८ जवान तैनात आहेत.
भारताचाही बचावकार्यात मोठा सहभाग
नेपाळमधील बचावकार्यात भारतासह चीन आणि दक्षिण कोरियातील तज्ज्ञ पथकांचाही सहभाग आहे. जलविद्युत प्रकल्पांच्या परिसरातून नेपाळी लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने २७९ जणांची सुटका करण्यात आली आहे.
भारताच्या तज्ज्ञ पथकाने रसुवा येथील अपर त्रिशूली-१ प्रकल्पाच्या परिसरातून दोन दिवसांत २५० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात मदत केली. भारतीय पथकाने सुरंगेत सुमारे तीन किलोमीटर आत जाऊन शोधमोहीम राबवली.नेपाळमधील या महापुराने मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी केली असून, आपत्तीच्या काळात बचाव पथकांसमोर निर्माण होणारी आव्हानेही यामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहेत.