सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
  • माणुसकीला काळीमा फासणारी घटना; नेपाळमध्ये पुराच्या पाण्यातील महिलेच्या मृतदेहावरील सोनं दोघांनी चोरलं, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून तातडीने कारवाई
  • नेपाळच्या महापुरात पुण्याचे ४ पर्यटक अडकले; ट्रॅव्हल कंपनीने साथ सोडल्याचा तरुणीचा आरोप, सरकारकडे मदतीची आर्त हाक
 जिल्हा

सप्टेंबरमध्येही पावसाची चिंता! राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत तूट कायम राहण्याचा अंदाज; पूर्व विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

डिजिटल पुणे    31-08-2026 17:48:51

मुंबई : राज्यात ऑगस्ट महिन्यात अपेक्षेच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहिल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातही बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, सध्या तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व विदर्भातील काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ऑगस्टमध्ये राज्यात पावसाची मोठी तूट

हवामान विभागाच्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मराठवाड्यात पावसाची तूट तब्बल ६९ टक्के, तर विदर्भात ५८ टक्के इतकी नोंदवण्यात आली. राज्याची एकूण सरासरी पावसाची तूट सुमारे ४६ टक्के असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईतही ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे ३३ टक्के कमी पाऊस झाला. पावसासाठी आवश्यक अशी प्रभावी हवामान प्रणाली निर्माण न झाल्याने राज्याच्या अंतर्गत भागात अपेक्षित पाऊस पडला नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

जुलैपर्यंत परिस्थिती समाधानकारक

जुलै महिन्यापर्यंत राज्यात पावसाचे प्रमाण तुलनेने चांगले होते. विशेषतः कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने संपूर्ण पावसाळ्याची स्थिती काही प्रमाणात समाधानकारक दिसत होती. मात्र, त्यानंतर महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पावसाला पोषक प्रणाली फारशा सक्रिय न झाल्याने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट निर्माण झाली.

पूर्व विदर्भात अतिवृष्टीची शक्यता

दरम्यान, सध्या राज्यात एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे.

सप्टेंबरच्या सुरुवातीलाही फारसा बदल नाही

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पावसाची परिस्थिती फारशी बदलण्याची शक्यता नाही. हवामान विभागाने राज्यासाठी कोणताही मोठा इशारा दिलेला नसला तरी पूर्व विदर्भात अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचवेळी राज्याच्या इतर भागांत पावसाची स्थिती तुलनेने कमीच राहण्याचा अंदाज आहे.

बहुतांश जिल्ह्यांत तूट कायम राहणार

सप्टेंबर महिन्यातही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता कायम राहण्याचा अंदाज आहे. कमी पावसाची ही शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच्या अंदाजातही व्यक्त केली होती. त्यामुळे सप्टेंबरमध्ये काही भागांत जोरदार पाऊस झाला, तरी संपूर्ण राज्यातील पावसाची तूट भरून निघण्यासाठी मोठ्या प्रमाणात आणि सातत्यपूर्ण पावसाची आवश्यकता राहणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती