राजगुरुनगर/पुणे : पुण्याच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीशी बोलत नसल्याच्या रागातून माजी सैनिक पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही, तर हा प्रकार पाहणाऱ्या १७ वर्षीय मुलाचाही गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुलाने घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याच्या हाताच्या अंगठ्यावर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे.
पत्नीच्या हत्येचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, दिपा महेंद्र दौंडकर (वय ४०) यांचा त्यांचे पती महेंद्र शिवाजी दौंडकर (वय ४५) यांनी गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. रविवारी (३० ऑगस्ट) रात्री साडेनऊ ते रात्री ११.३५ वाजण्याच्या दरम्यान राजगुरुनगर येथील वाडा रोड परिसरातील राहत्या घरी ही घटना घडली.
आईला उठवण्यासाठी मुलगा बेडरूममध्ये गेला
मुलगा अथर्व (वय १७) हा आईला उठवण्यासाठी बेडरूममध्ये गेला असता त्याला आईसोबत घडलेला प्रकार दिसला. यावेळी आरोपी वडिलांनी अथर्वचाही ओढणीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
मुलावर चाकूने वार, जीवे मारण्याची धमकी
अथर्वने आरडाओरड करत घराबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्याला "तुला चाकूने भोसकेन" अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर चाकूने वार करण्यात आला.
आरोपी फरार; पोलिसांकडून शोध सुरू
या घटनेप्रकरणी अथर्वच्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी महेंद्र दौंडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, खेड पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे राजगुरुनगर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.