अकोला : उपचारासाठी दवाखान्यात गेलेल्या नागपूरच्या तरुणीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपामुळे अकोल्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी शहरातील एका ४६ वर्षीय त्वचारोगतज्ज्ञाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील तरुणी २९ ऑगस्ट रोजी उपचारासाठी अकोल्यातील संबंधित डॉक्टरच्या दवाखान्यात गेली होती. इतर रुग्ण निघून गेल्यानंतर डॉक्टरने तिला स्वतंत्रपणे चेंबरमध्ये बोलावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर तपासणी आणि चेहऱ्यावरील केसांवर उपचार करण्याच्या कारणावरून तिला दवाखान्यातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेण्यात आल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी डॉक्टरने आपल्यासोबत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तसेच औषध देण्याच्या बहाण्याने वैद्यकीय दुकानातही लज्जास्पद वर्तन केल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे.
कुटुंबीयांना सांगितला प्रकार; पोलिसांत धाव
घटनेनंतर तरुणीने घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांसह तिने सिव्हिल लाइन्स पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित डॉक्टरविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७४ आणि ७५(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे डॉक्टरला ताब्यात घेतले असून, तक्रारीतील आरोपांची पडताळणी आणि घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
डॉक्टरविरोधात यापूर्वीही गुन्हा?
दरम्यान, संबंधित डॉक्टरविरुद्ध यापूर्वीही विनयभंगाच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. २ मे २०२४ रोजी एका महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती आहे.
ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा संताप
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकर यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी संबंधित डॉक्टरची भेट घेतल्याची आणि त्याच्यासोबत मारहाणीचा प्रकार घडल्याची चर्चा आहे. मात्र, या बाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.या प्रकरणामुळे रामनगर परिसरासह अकोला शहरात चर्चेला उधाण आले असून, पोलिसांच्या तपासानंतर घटनेतील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.