सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर बंदी; पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय
  • मोठी बातमी : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट!
  • स्कुटीच्या सीटखाली लपवलं किलोभर अंमली पदार्थ; जळगाव पोलिसांनी सापळा रचला, 11 लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक
  • पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी पुण्यात मोठी कारवाई, मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक, अमित ठाकरेंवरही गुन्हा
 विश्लेषण

एकनाथ शिंदे बैठकीला गैरहजर; फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 4 मोठे निर्णय, तुकाराम मुंढेंच्या कारवाईचीही चर्चा

डिजिटल पुणे    01-09-2026 15:45:40

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (1 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बैठकीला उपस्थित होत्या, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अनुपस्थित होते. या बैठकीत राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे चार निर्णय घेण्यात आले.विशेष म्हणजे, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शासकीय-निमशासकीय बैठका, विविध कार्यक्रम आणि उपहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. संतुलित मेन्यू ठेवण्यावरही भर देण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाचे चार महत्त्वाचे निर्णय

1. 2029 पर्यंत महाराष्ट्र नशामुक्त करण्याचे लक्ष्य

‘नशामुक्त भारत अभियान’अंतर्गत महाराष्ट्रातून 2029 पर्यंत अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे. यासाठी सर्वसमावेशक शासकीय धोरणाला मंजुरी देण्यात आली.

2. सरकारी कार्यक्रमांमध्ये आरोग्यदायी खाद्यपदार्थ अनिवार्य

शासकीय आणि निमशासकीय बैठका, कार्यक्रम तसेच उपहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या धोरणास मान्यता देण्यात आली. यामध्ये संतुलित मेन्यू ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

3. सोलापुरातील उन्नत मार्गाला सार्वजनिक प्रकल्पाचा दर्जा

सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या मार्गावरील उन्नत मार्ग प्रकल्पाला निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील या प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

4. कुकडी प्रकल्पासाठी 5,704 कोटींची तरतूद

पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी तब्बल 5 हजार 704 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे सुमारे 1 लाख 44 हजार 912 हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा चर्चेत प्रभाव

दरम्यान, राज्यात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवायांमुळे आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तपासणी आणि कारवाईची मोहीम राबवली जात आहे.

कठोर आणि शिस्तप्रिय प्रशासनासाठी परिचित असलेल्या तुकाराम मुंढे यांनी यापूर्वी नाशिक महापालिका, पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML), नागपूर महापालिका, सोलापूर महापालिका यांसह विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. प्रशासनातील शिस्त, नियमांची अंमलबजावणी आणि जनहिताच्या मुद्द्यांवर कठोर भूमिका घेण्यासाठी त्यांची ओळख आहे.याच पार्श्वभूमीवर सरकारी बैठकांपासून उपहारगृहांपर्यंत आरोग्यदायी अन्नपदार्थांचा आग्रह धरणाऱ्या नव्या धोरणाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती