सोलापूर : आईने अभ्यासाला बसण्यास सांगितल्याने नाराज झालेल्या १६ वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. अक्षरा मारुती जाधव असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. समाधान नगर, अक्कलकोट रोड परिसरात सोमवारी (३१ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षरा जाधव ही यंदा दहावीच्या वर्गात शिकत होती. दहावीची परीक्षा असल्याने तिच्या अभ्यासाकडे कुटुंबीयांचे लक्ष होते. सोमवारी आईने तिला ‘दहावीला आहेस, अभ्यास करत जा’ असे सांगितले होते. त्यानंतर अक्षरा नाराज झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
काही वेळाने अक्षरा घरात गंभीर अवस्थेत आढळून आली. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी तिला तातडीने सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तिच्या भावाने दुपारी सुमारे ४.२० वाजता तिला रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
आईने अभ्यासाला सांगितल्याने नाराज?
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आईने अभ्यास करण्यास सांगितल्यानंतर अक्षरा नाराज झाली होती. याच कारणातून तिने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अभ्यासाच्या दबावातून ही घटना घडली का, याचीही चर्चा परिसरात सुरू आहे.मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद अज्ञात कारणातून केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.
आई-वडील वीटभट्टीवर काम करतात
अक्षराचे आई-वडील दोघेही वीटभट्टीवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दहावीत शिकणाऱ्या अक्षराने आत्महत्या केल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांकडून घटनाक्रमाची चौकशी
या प्रकरणाची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, आत्महत्येमागील कारण आणि घटनेपूर्वीची परिस्थिती याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात असून, तपासानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.