पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या गणेश मिरवणुकांमध्ये लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत गणेश मिरवणुकांमध्ये लेझर लाईट वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये आकर्षक रोषणाई आणि लेझर शोचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, लेझरच्या तीव्र प्रकाशामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. विशेषतः डोळ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच मोठ्या गर्दीत अशा प्रकाशयंत्रणेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
गणेश मंडळांसह संस्थांनाही निर्बंध
१४ ते २५ सप्टेंबरदरम्यान गणेश मंडळे, विविध संस्था किंवा कोणत्याही संबंधित व्यक्तींना मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर करता येणार नाही. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित मंडळ, संस्था किंवा व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
त्यामुळे गणेश मंडळांनी मिरवणुकीचे नियोजन करताना प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
डीजेच्या मुद्द्यानंतर लेझरवरही निर्बंध
दरम्यान, पुण्यात गणेश मिरवणुकांमधील डीजेच्या वापराचा मुद्दाही चर्चेत आहे. डीजेच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासावरून अनेकांकडून विरोध केला जात आहे. पुण्यातील विद्यानंद बापट यांनीही हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आहे. त्यातच आता प्रशासनाने लेझर लाईटवर निर्बंध घातल्याने गणेशोत्सवातील मिरवणुकांबाबत आणखी एक महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे.
नागरिकांची सुरक्षितता केंद्रस्थानी
गणेशोत्सव हा उत्साह आणि जल्लोषाचा सण असला तरी उत्सव साजरा करताना नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे प्रशासनाने अधोरेखित केले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेश मिरवणुकांमध्ये लेझर लाईटऐवजी पर्यायी रोषणाईचा वापर करण्याची वेळ गणेश मंडळांवर येणार आहे.