सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाकरे गटाच्या जोरदार युक्तिवादानंतर आज शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार; धनुष्यबाण चिन्हाचा वाद निर्णायक टप्प्यावर
  • : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी 2 नंतर पुन्हा सुनावणी होणार आहे
 शहर

पुण्यात गणेशोत्सवात ‘लेझर’ला बंदी कायम; ध्वनीप्रदूषणाचे नियम मोडल्यास थेट गुन्हा दाखल, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

डिजिटल पुणे    02-09-2026 15:40:55

पुणे : गणेशोत्सवासाठी पुण्यातील गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना यंदाच्या उत्सवात डीजे, ध्वनीक्षेपक, लेझर लाईट आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

पुणेकर विद्यानंद बापट यांनी डीजेमुक्त गणेशोत्सवाची मागणी करत ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा संदर्भ देत त्यांनी गणेशोत्सवातील कर्णकर्कश आवाजाविरोधात भूमिका मांडली. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या विषयाला पुन्हा एकदा व्यापक चर्चा मिळाली.

गणेशोत्सवात लेझरवर बंदीच राहणार

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी यंदाच्या गणेशोत्सवाबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. पुणे शहरातील गणेशोत्सवात लेझर लाईटवर बंदी कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ध्वनीप्रदूषणासंदर्भातील न्यायालयीन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून शहरातील गणेश मंडळांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये ध्वनीप्रदूषण, डीजे, ध्वनीक्षेपक तसेच न्यायालयाने निश्चित केलेल्या नियमांबाबत मंडळांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

‘नियम मोडल्यास गुन्हे दाखल होणारच’

गणेशोत्सव साजरा करताना न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात उत्सवाचा जल्लोष करताना ध्वनीप्रदूषणाच्या मर्यादा आणि न्यायालयीन आदेशांचे पालन करण्याचे मोठे आव्हान गणेश मंडळांसमोर असणार आहे.

शरद केळकरांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव

दरम्यान, पुण्यातील ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत पोहोचला आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील रहिवासी शरद केळकर यांनी पुण्यातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि जीवनमानावर परिणाम होत असल्याचा मुद्दा तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. या तक्रारीची दखल घेत आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा अधिक गंभीर बनला असून प्रशासन, गणेश मंडळे आणि नागरिक यांच्यातील समन्वयाची कसोटी लागणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती