अयोध्या : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या व्यवस्थापनाशी संबंधित मोठी घडामोड समोर आली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिराच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सीईओ) नियुक्ती केली आहे. भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.जितेंद्र मिश्रा हे नियुक्तीच्या तारखेपासून पुढील तीन वर्षे राम मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. याच वर्षी एप्रिलमध्ये ते भारतीय हवाई दलाच्या सेवेतून निवृत्त झाले आहेत.
38 वर्षांचा प्रदीर्घ लष्करी अनुभव
एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय हवाई दलात तब्बल 38 वर्षे सेवा बजावली आहे. लढाऊ विमानांचे वैमानिक, कॉम्बॅट इन्स्ट्रक्टर आणि टेस्ट पायलट अशा विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.1999 च्या कारगिल युद्धात तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्याशी त्यांचा संबंध असून ते एनडीए खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत. लढाऊ विमान उडवण्याचा त्यांना 3 हजार तासांहून अधिक अनुभव आहे. उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना *‘सर्वोत्तम युद्ध सेवा मेडल’*ने गौरवण्यात आले आहे.
5500 हून अधिक अर्ज; 18 उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग
राम मंदिराच्या सीईओ पदासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज मागवण्यात आले होते. या पदासाठी 5500 हून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यातून 18 उमेदवारांची अंतिम प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.
शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची मुलाखत आणि विविध स्तरांवर पडताळणी करण्यात आली. त्यांच्या जीवनशैलीपासून धार्मिक श्रद्धा आणि हिंदू धर्माशी संबंधित विविध बाबींवरही प्रश्न विचारण्यात आल्याचे समोर आले आहे.सीईओ निवडीसाठी ट्रस्टकडून निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली, विष्णुकांत चतुर्वेदी आणि सुरेश हावडे यांची तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.
सीईओ म्हणून नेमकी काय असेल जबाबदारी?
राम मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. मंदिराचा दैनंदिन कारभार, प्रशासकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्थापन, कायदेशीर बाबी, भाविकांच्या सुविधा आणि सुरक्षा यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर सीईओ यांचे नियंत्रण राहणार आहे.
मंदिरात येणाऱ्या लाखो भाविकांचे व्यवस्थापन, सुविधा अधिक सक्षम करणे आणि ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणे हीदेखील त्यांच्या प्रमुख जबाबदाऱ्यांपैकी एक असणार आहे.
दानाच्या चोरीच्या घटनेनंतर सीईओ पदाची गरज
राम मंदिरातील दानपेटी आणि देणग्यांशी संबंधित चोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर मंदिर व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवरही चर्चा झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना अटक केली होती.या पार्श्वभूमीवर मंदिराच्या प्रशासकीय व्यवस्थेला अधिक व्यावसायिक आणि पारदर्शक स्वरूप देण्यासाठी स्वतंत्र सीईओ पदाची गरज व्यक्त करण्यात आली होती. आता जितेंद्र मिश्रा यांच्या नियुक्तीमुळे राम मंदिराच्या व्यवस्थापनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.लष्करी सेवेत दीर्घ अनुभव असलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर आता अयोध्येतील राम मंदिराच्या व्यापक प्रशासकीय व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.