सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाकरे गटाच्या जोरदार युक्तिवादानंतर आज शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार; धनुष्यबाण चिन्हाचा वाद निर्णायक टप्प्यावर
  • : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी 2 नंतर पुन्हा सुनावणी होणार आहे
 विश्लेषण

नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार! सात दिवसांनंतरही संकट कायम; 1,127 हून अधिक मृत्यू, जवळपास 5 हजार बेपत्ता

डिजिटल पुणे    02-09-2026 19:05:18

काठमांडू : नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी महापुराने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. भोटेकोशी आणि त्रिशुली नदी खोऱ्यात आलेल्या पुरामुळे अनेक भाग अक्षरशः उद्ध्वस्त झाले असून, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या भीषण आपत्तीला आज सात दिवस पूर्ण झाले असले तरी परिस्थिती अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. अनेक भागांमध्ये बचावकार्य सुरू असून, हजारो नागरिकांचा अद्याप शोध लागलेला नाही.

मृतांचा आकडा 1,127 पार; जवळपास 5 हजार जण बेपत्ता

2 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध माहितीनुसार, नेपाळमध्ये महापुरामुळे 1,127 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तिबेटमध्ये झालेल्या आणखी 16 मृत्यूंची भर पडल्यास मृतांचा एकूण आकडा 1,143 वर पोहोचतो. तर तब्बल 4,858 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.बेपत्ता नागरिकांमध्ये 583 परदेशी नागरिक आणि 83 नेपाळी सुरक्षा कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 12 हजारांहून अधिक नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या आपत्तीचा परिणाम 17 नगरपालिकांमधील अंदाजे 84,270 नागरिकांवर झाला आहे.

चितवन, नवलपरासीमध्ये सर्वाधिक हानी

महापुराचा सर्वाधिक फटका चितवन आणि नवलपरासी जिल्ह्यांना बसला आहे. चितवनमध्ये 321, नवलपरासी पूर्वमध्ये 216, तर नवलपरासी पश्चिममध्ये 170 मृत्यू झाल्याची माहिती आहे.नुवाकोट जिल्ह्यातील बेटावती येथील उत्तरगया मिनी मार्टमधून तब्बल 24 मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये 13 महिला, 10 पुरुष आणि एका मुलाचा समावेश होता.भोटेकोशी मार्गावरील रसुवागढी इमिग्रेशन कार्यालयही पुराच्या तडाख्यात पूर्णपणे वाहून गेले. दुर्घटनेच्या वेळी या ठिकाणी सुमारे 300 ते 400 लोक उपस्थित होते. कार्यालय प्रमुखासह चार इमिग्रेशन कर्मचारी बेपत्ता झाले होते. त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा मृतदेह नंतर नदीच्या प्रवाहात दूरवर आढळून आला.

639 कामगार बोगद्यांमध्ये अडकले असण्याची शक्यता

नेपाळी सैन्याने सातव्या दिवशीही शोध आणि बचाव मोहीम सुरू ठेवली आहे. त्रिशुली नदीच्या परिसरातील जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या कामगारांचा शोध घेणे हे बचाव पथकांसमोरील मोठे आव्हान बनले आहे.

पाणी आणि चिखलामुळे अनेक बोगद्यांचे मार्ग बंद झाले आहेत. या ठिकाणी सुमारे 639 कामगार अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बचाव आणि ढिगारा हटवण्याच्या कामासाठी भारत, चीन आणि दक्षिण कोरियाकडून तज्ज्ञांची मदत घेण्याची तयारी करण्यात आली आहे.दरम्यान, काही भागांत सुरू असलेला पाऊस आणि नव्याने होणाऱ्या भूस्खलनामुळे बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण होत आहे. दुर्गम भागातील अनेक गावांपर्यंत अद्याप मदत पोहोचलेली नाही.

ओळख पटत नसलेल्या मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार

पुरामुळे मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्णालये आणि शवागारेही मृतदेहांनी भरून गेली आहेत. अनेक मृतदेह दीर्घकाळ पाणी आणि चिखलात राहिल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ओळख न पटलेल्या मृतदेहांचे तात्पुरते दफन करण्याचा निर्णय घेतला. काठमांडूतील गोकर्ण फॉरेस्ट रिसॉर्ट परिसरात दफनभूमी तयार करण्यात आली. जेसीबीच्या मदतीने मोठे खड्डे खोदून सुमारे 75 मृतदेह दफन करण्यात आले.प्रत्येक मृतदेहाला स्वतंत्र क्रमांक देण्यात आला असून, भविष्यात कुटुंबीयांना ओळख पटवता यावी यासाठी छायाचित्रे, डीएनए नमुने आणि इतर ओळखविषयक माहिती जतन करण्यात आली आहे. यापूर्वीही चार वेगवेगळ्या ठिकाणी 200 हून अधिक मृतदेहांचे दफन करण्यात आले होते.

583 परदेशी नागरिक बेपत्ता

या महापुरात बेपत्ता झालेल्या नागरिकांमध्ये मोठ्या संख्येने परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. तब्बल 583 परदेशी नागरिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये 275 भारतीय नागरिक आहेत.याशिवाय 32 चिनी, नऊ अमेरिकन नागरिकांसह ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इटलीसह विविध देशांतील नागरिकांचा समावेश आहे. यापैकी अनेक जण पर्यटक, व्यावसायिक तसेच जलविद्युत प्रकल्पांवर काम करणारे अभियंते आणि कामगार होते.

पुराचा धोका अद्याप टळलेला नाही

नेपाळमधील पूरस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नसून, नागरिकांना अद्याप सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नेपाळच्या हवामान विभागाने नवीन हवामानविषयक इशारा जारी केला आहे.पूर्व, मध्य आणि पश्चिम नेपाळमधील काही नद्यांची पाणीपातळी पुन्हा वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः नुवाकोट आणि रसुवा जिल्ह्यांतील लहान नद्या आणि ओढ्यांना अचानक पूर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पंतप्रधान बलेंद्र शाह यांच्यावर UNGA साठी दबाव

या भीषण नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांच्यावर संयुक्त राष्ट्र महासभेत सहभागी होण्यासाठी दबाव वाढत आहे.नेपाळचा जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनातील वाटा अत्यल्प असतानाही हवामान बदलाचा मोठा फटका देशाला बसत असल्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मांडण्याची सरकारची भूमिका आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मदत, पुनर्वसन आणि पुनर्बांधणीसाठी जागतिक समुदायाला आवाहन करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यापूर्वी परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांना संयुक्त राष्ट्र महासभेसाठी पाठवण्याची योजना होती. मात्र, आता या निर्णयात बदल होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदतीचा हात

पूर आणि भूस्खलनामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात ढिगारा जमा झाला आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या अहवालानुसार, या आपत्तीमुळे सुमारे 2.2 दशलक्ष टन ढिगारा निर्माण झाला आहे. यामध्ये इमारतींचे अवशेष, खडक, गाळ आणि घरगुती वस्तूंचा समावेश आहे.रेड क्रॉसने 25 दशलक्ष स्विस फ्रँकची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर ब्रिटिश क्राउन डिपेंडन्सी असलेल्या जर्सीनेही 2 लाख युरो मदतीची घोषणा केली आहे.

भारताकडून नेपाळला मोठी मदत

नेपाळमधील पूरस्थिती लक्षात घेऊन भारतानेही तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. भारताकडून आतापर्यंत पाच मदत विमानांद्वारे 68.5 टनांहून अधिक मदत सामग्री नेपाळमध्ये पोहोचवण्यात आली आहे.दरम्यान, नेपाळसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे अद्याप बेपत्ता असलेल्या हजारो नागरिकांचा शोध, दुर्गम भागांमध्ये मदत पोहोचवणे आणि नव्या पुराचा धोका टाळणे हे आहे. सात दिवस उलटूनही संकटाची तीव्रता कायम असल्याने पुढील काही दिवस नेपाळसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.


 Give Feedback



 जाहिराती