सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • माझे नेते 2029 पर्यंत मला महाराष्ट्रातच ठेवणार; माझा पक्ष ठरवेल त्या दिवशी जरूर मी दिल्लीला जाईन- देवेंद्र फडणवीस
  • पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “पुण्यासारख्या ठिकाणी असे वाद योग्य नाहीत”
  • चिंताजनक! पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा वाढता धोका; ऑगस्टमध्येच 31 रुग्ण, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन
  • पुण्यात DJ वरून गोंधळ, नागपुरात मात्र ‘आवाजावर ब्रेक’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; DJ-डॉल्बीसह लेझर बीमवर बंदी
 शहर

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना मारहाण; हल्ल्यानंतर म्हणाले, “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...”

डिजिटल पुणे    03-09-2026 12:52:26

पुणे : गणेशोत्सवातील डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात सातत्याने भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील गणेशोत्सव, ध्वनीप्रदूषण आणि डीजेचा वाढता आवाज याविरोधात बापट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर हल्ला झाल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

डीजेविरोधातील भूमिकेमुळे चर्चेत

पुण्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डीजे तसेच ढोल-ताशा पथकांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा विद्यानंद बापट यांनी सातत्याने उपस्थित केला आहे. यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या सभेतही त्यांनी डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केला होता. त्यांच्या भूमिकेला काही गणेश मंडळांचे प्रतिनिधी तसेच राजकीय व्यक्तींनी विरोध केला होता. त्या वेळी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पालिका सुरक्षारक्षकांच्या बंदोबस्तात बाहेर काढण्यात आले होते.मात्र, आता बापट यांच्यावर प्रत्यक्ष मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

हल्ल्यानंतर विद्यानंद बापट काय म्हणाले?

मारहाणीच्या घटनेनंतर बापट यांनी माध्यमांशी बोलताना हल्लेखोरावर कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, आपण सशस्त्र नसल्याचे आणि पोलीस उपस्थित नसल्याचे पाहून आपल्यावर हल्ला करण्यात आला.यावेळी त्यांनी चर्चेत असलेला “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...” हा श्लोक पुन्हा उच्चारला. प्रसिद्धीसाठी आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही तसेच व्हिडीओ फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.उत्सव साजरा करण्याला आपला विरोध नसून, सार्वजनिक उत्सवांच्या वेळी ध्वनीप्रदूषण होऊ नये आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, एवढीच आपली भूमिका असल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले.

कोण आहेत विद्यानंद बापट?

विद्यानंद बापट हे मूळचे रत्नागिरीचे असून गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ परिसरात वास्तव्यास आहेत. ते बीपीओ क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या कामाचा मोठा भाग घरूनच सुरू असतो. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे.

पुण्यातील विविध पुरोगामी संघटनांच्या उपक्रमांमध्येही ते सहभागी होत असल्याचे सांगितले जाते. कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या बापट यांनी ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा सातत्याने मांडल्याने त्यांची राज्यभर चर्चा झाली.

“घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...” श्लोकाची सोशल मीडियावर चर्चा

विद्यानंद बापट यांनी यापूर्वी “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्...” असा श्लोक म्हटला होता. त्यानंतर हा श्लोक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या श्लोकावर अनेक रिल्स आणि पोस्टही पाहायला मिळाल्या.या श्लोकाचा अर्थ काय, याबाबतही सोशल मीडियावर चर्चा झाली. बापट यांच्या स्पष्टीकरणानुसार, मडके फोडणे, वस्त्र फाडणे आणि गाढवावर बसणे; मात्र कोणत्याही प्रकारे प्रसिद्धी मिळवणे, असा त्याचा आशय आहे.

विद्यानंद बापट यांच्या भूमिकेला शरद केळकरांचीही साथ

पुण्यातील गणेशोत्सवातील डीजे आणि वाढत्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा आता आणखी व्यापक होताना दिसत आहे. विद्यानंद बापट यांच्यानंतर पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील रहिवासी शरद केळकर यांनीही ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे.

केळकर यांनी पुण्यातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.


 News Feedback

Digital Pune
Kulkarni Satish
 03-09-2026 14:23:09

Very bad

 Give Feedback



 जाहिराती