पुणे : गणेशोत्सवादरम्यान ध्वनीमर्यादांचे पालन व्हावे, यासाठी सातत्याने भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणात संतोष चव्हाण याच्यावर आरोप असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.घटनेनंतर पुणे पोलिसांकडून गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधताना हल्ल्याच्या प्रकरणात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
आयुक्तांनी सांगितले की, विद्यानंद बापट यांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येत असून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. तसेच आरोपीची पोलिस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयाकडे मागणी केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बापट यांच्या सुरक्षेसाठी २४ तास पोलिस बंदोबस्त
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यानंद बापट यांना पुढील आदेशापर्यंत चोवीस तास पोलिस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.दरम्यान, या घटनेचा गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी सर्वांनी जबाबदारीने व संयमाने वागण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
बापट यांच्याविरोधातील तक्रारही चर्चेत
दुसरीकडे, विद्यानंद बापट यांच्याविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. या अर्जाच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, काही व्यक्तींनी तक्रार अर्ज पोलिसांकडे दिला आहे. मात्र, अर्जातील बाबींमध्ये सध्या गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट होत नसल्याने हे प्रकरण चौकशीच्या स्तरावर आहे. चौकशीनंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.
संतोष चव्हाणविरोधात यापूर्वीही गुन्हे
विद्यानंद बापट यांना मारहाण केल्याचा आरोप असलेल्या संतोष चव्हाणची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. राऊतवाडी परिसरात राहणाऱ्या चव्हाणविरोधात पुणे शहरात पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जात आहे.मारामारी आणि कट रचणे यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये त्याच्यावर यापूर्वीही पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.