सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • देव तारी त्याला कोण मारी! ना अन्न ना पाणी, तब्बल 9 दिवस मृत्यूशी झुंज, महापुरात अडकलेल्या 2 जणांची सुटका
  • ‘विद्यानंद बापटांची भूमिका योग्य’; डीजेच्या मुद्द्यावर शरद पवारांचा मोठा दावा, हल्लेखोरांनाही सुनावलं
 शहर

हार-फुलांऐवजी बाप्पाच्या चरणी अर्पण करा ‘एक वही, एक पेन’; नवग्रह मित्र मंडळाचा अनोखा सामाजिक उपक्रम;२००० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा संकल्प; आतापर्यंत ५५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मदत

डिजिटल पुणे    04-09-2026 10:39:56

पुणे : संस्कृती, परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम साधत कसबा पेठेतील मानाचे नवग्रह मित्र मंडळ यंदा ७७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘हार-फुलांऐवजी बाप्पाच्या चरणी अर्पण करा एक वही, एक पेन’ हा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागातील तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. गणेशभक्तांकडून जमा होणारे शैक्षणिक साहित्य मंडळामार्फत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

५५०० हून अधिक विद्यार्थ्यांना मदत

गेल्या काही वर्षांमध्ये गणेशभक्तांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी, तसेच पुणे शहरातील विविध गरजू घटकांतील ५५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली आहे. आतापर्यंत २५ हजारांहून अधिक वह्या आणि १५ हजारांहून अधिक पेन-पेन्सिल, तसेच इतर उपयुक्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

यंदा २००० हून अधिक विद्यार्थ्यांना मदतीचे उद्दिष्ट

‘गणेशोत्सव २०२६’ मध्ये २००० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प मंडळाने केला आहे. गणेशभक्तांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

गणेशभक्तांना मंडळाचे आवाहन

यंदा गणरायाच्या दर्शनासाठी येताना हार, फुले, नारळ किंवा पेढ्यांऐवजी ‘एक वही आणि एक पेन’ बाप्पाच्या चरणी अर्पण करावे, असे आवाहन नवग्रह मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. दहा दिवसांच्या कालावधीत जमा होणाऱ्या साहित्यामध्ये मंडळाकडून आवश्यक ती भर घालून ते थेट गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

उपक्रमाचा कालावधी : १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर

दान स्वीकारण्याचे ठिकाण : नवग्रह मित्र मंडळ, शनिवारवाड्यासमोर, कसबा पेठ, पुणे.

प्रत्यक्ष वही-पेन किंवा शैक्षणिक साहित्य आणणे शक्य नसलेल्या भक्तांसाठी रोख अथवा ऑनलाइन देणगीच्या स्वरूपातही योगदान देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.“बाप्पाच्या चरणी हार-फुलांऐवजी एका विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी वही-पेन अर्पण करा,” असा संदेश देत नवग्रह मित्र मंडळाने पुणेकरांसह गणेशभक्तांना या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

संपर्क : अनिकेत मुंदडा – ९९६०४७०५६०

 

 


 Give Feedback



 जाहिराती