सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दहीहंडीचा लोखंडी सांगाडा डोक्यात कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू, जुन्या सांगवीतील खळबळजनक घटना
 जिल्हा

संत तुकोबांच्या भंडारा -भामचंद्र मुक्ती संघर्षाची प्रकर्षाने दखल घेवून सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मुख्य सचिव यांना दिले निर्देश!

डिजिटल पुणे    05-09-2026 10:31:11

मुंबई : जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या भामचंद्र, भंडारा व घोराडेश्वर डोंगर या तपोभूमीला संरक्षित करण्यासाठी संतभूमी संरक्षक संघर्ष समितीची मंत्रालयीन सर्व सचिवांबरोबर तातडीची बैठक दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी नामदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पार पडली.

संत तुकाराम महाराज यांना  भामचंद्र डोंगरावर विठ्ठलाच्या स्वरूपाचा आत्मसाक्षात्कार झाला . या तपोभूमी डोंगराच्या पायथ्याला विकासाच्या नावाने खनिज उत्खनन , एमआयडीसी द्वारा अतिक्रमण करून तोडण्यात येत असल्याने संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे प्रमुख, तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचे अभ्यासक व साक्षात्कारावर संशोधन करणारे मधुसूदन पाटील महाराज हे कित्येक वर्षांपासून लढा देत आहेत.

या तपोभूमी परिसराचे पावित्र्य ,ऐतिहासिक महत्व तसेच जैवविविधता अबाधित रहावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने नोव्हेंबर 2011 ला भंडारा भामचंद्र डोंगरांच्या संरक्षणार्थ राज्य संरक्षित स्मारक म्हणून अधिसूचना घोषित केली आहे तरी सुद्धा येथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण,बेकादेशीर गौण खनिज उत्खनन सुरू आहे. त्या विरोधात संबंधित विभागांशी अविश्रांतपणे पाठपुरावा करून सन 2011 च्या अधिसूचनेचे तंतोतंत पालन करण्यात यावे अशी विनंती मधुसूदन पाटील महाराज हे सातत्याने करीत होतें.

संतभूमीच्या अस्तित्वासाठी चाललेल्या या लढ्याला मराठा महासंघाचे पदाधिकारी यांनी मधुसूदन महाराजांना पाठिंबा दिला आहे . सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलार यांनी या लढ्याची तात्काळ दखल घेऊन मधुसूदन महाराजांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले. बैठकीतील उपस्थित शासन प्रशासन स्तरावरील संबंधित सर्व अधिकाऱ्यांना  संबोधित केले की हा अत्यंत महत्वाचा विषय आहे तो गांभीर्याने घ्यावा व महिन्याभरात राज्याचे मुख्य सचिवांनी अधिसूचनेच्या अनुषंगाने भामचंद्र भंडारा डोंगर जतन संवर्धनासाठी मंत्रीमंडळ स्तरावरील बैठक आयोजित करण्याचे निर्देश शेलार यांनी दिले. मधुसूदन महाराजांना पुढील कार्यवाही त्वरित कळवण्यात येईल असे सांगण्यात आले.

या बैठकीला  संबंधित सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी प्रत्यक्ष व व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा उपस्थित होते.अखिल भारतीय मराठा महासंघ व संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या वतीने भामचंद्र डोंगर प्रतिमा व अभंग गाथा भेट देऊन नामदार आशिष शेलार यांचा सत्कार केला.यावेळी मधुसूदन पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप आध्यात्मिक वारकरी आघाडीचे बब्रुवान शेंडगे पाटील, संयुक्त सरचिटणीस राजेश घाणेकर सेवा निवृत न्यायाधीश, मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे कार्याध्यक्ष महेश सावंत मुंबई शहराध्यक्ष अविनाश राणे, बाळकृष्ण लाड सरचिटणीस, प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब फपाळ, प्रा.निळकंठ शेंडगे उपस्थित होते.डॉ.प्रवीणकुमार राऊत ह्यांनी आंदोलनाचे दस्तऐवज बैठकीत सुपूर्द केले.बैठकीनंतर मधुसूदन पाटील महाराज मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांनी प्रसार माध्यमांना भामचंद्र मुक्ती लढा आणि पुढील आंदोलनाची दिशा आपले मनोगत व्यक्त केले.

 

 


 Give Feedback



 जाहिराती