सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दहीहंडीचा लोखंडी सांगाडा डोक्यात कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू, जुन्या सांगवीतील खळबळजनक घटना
 DIGITAL PUNE NEWS

बेडवर कुजलेला मृतदेह, हात वरच्या दिशेने; प्रसिद्ध पंजाबी गायकाच्या मृत्यूने खळबळ, घरात रक्ताचे डाग आढळल्याने वाढला संशय

डिजिटल पुणे    05-09-2026 10:56:04

पंजाब :मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक बलजीत सिंह यांचा त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला घरातील रक्ताचे डाग पाहून पोलिसांनाही या घटनेमागे काही घातपात आहे का, असा संशय आला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे.

चार-पाच दिवसांपासून संपर्क तुटला होता

बलजीत सिंह हे पंजाबमधील सुधर येथील धालीवाल परिसरात एकटे राहत होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होत नव्हता. मात्र, याबाबत कोणाला विशेष संशय आला नव्हता. 3 सप्टेंबरच्या सकाळी त्यांच्या घरातून अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे शेजाऱ्यांना घरात काहीतरी अघटित घडल्याचा संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी घरात प्रवेश करताच धक्कादायक दृश्य

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात प्रवेश केल्यानंतर बलजीत सिंह यांचा मृतदेह पलंगावर आढळून आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झाली होती. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांचा मृतदेह अर्धवट टेकलेल्या अवस्थेत होता आणि हात वरच्या दिशेने असल्याचे सांगितले जात आहे.याहून धक्कादायक बाब म्हणजे घरातील विविध ठिकाणी, विशेषतः खोल्यांमध्ये रक्ताचे डाग आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास संशयास्पद मृत्यूच्या दिशेने सुरू केला.

फॉरेन्सिक आणि श्वानपथकाकडून तपास

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फॉरेन्सिक टीम, श्वानपथक आणि सीआयए पथकाला घटनास्थळी बोलावले. घरातील तसेच परिसरातील संभाव्य पुरावे तपासण्यात आले. कुटुंबीय आणि नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आली.बलजीत यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या घरी कोण आले होते, याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच गेल्या काही दिवसांत ते कोणाच्या संपर्कात होते, याची माहितीही पोलीस गोळा करत आहेत.

पोस्टमार्टम रिपोर्टने उलगडलं मृत्यूचं कारण

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बलजीत सिंह यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे.त्यामुळे घरात आढळलेल्या रक्ताच्या डागांमुळे निर्माण झालेला सुरुवातीचा संशय काहीसा दूर झाला आहे. मात्र, घरातील रक्ताचे डाग नेमके कशामुळे आढळले, याची पडताळणी पोलिसांकडून अद्याप केली जात आहे. त्यामुळे तपास पूर्णपणे थांबलेला नसून इतर सर्व शक्यतांचीही छाननी सुरू आहे.

35 वर्षीय गायकाचा दुर्दैवी अंत

बलजीत सिंह हे अवघे 35 वर्षांचे होते. ते एकटे राहत असल्याने त्यांच्या मृत्यूची माहिती काही दिवसांपर्यंत कोणालाही मिळाली नाही. अखेर घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले आणि त्यानंतर ही दुर्दैवी घटना समोर आली.पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

व्यसनामुळे करिअरवरही झाला होता परिणाम

मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही काळात बलजीत सिंह व्यसनाच्या आहारी गेल्याची चर्चा होती. त्याचा त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीवरही परिणाम झाल्याचे सांगितले जाते. याशिवाय पंजाबमधील गँगस्टर्सचे उदात्तीकरण करणारी गाणी लिहिल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.

मात्र, या सर्व बाबींचा त्यांच्या मृत्यूशी थेट संबंध असल्याचे सध्या कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांचा तपास सध्या त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीसह घरात आढळलेल्या रक्ताच्या डागांवर आणि इतर पुराव्यांवर केंद्रित आहे.बलजीत सिंह यांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे समोर आले असले, तरी त्यांच्या घरातील संशयास्पद परिस्थितीमुळे पोलिसांचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती