पिंपरी-चिंचवड : दहीहंडी उत्सवाचा जल्लोष संपल्यानंतर लोखंडी सांगाडा उतरवताना झालेल्या भीषण अपघातात ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात रात्रीच्या सुमारास घडली. सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री सुमारे ११ वाजता मंडळाचे कार्यकर्ते दहीहंडीसाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा काढत होते. यावेळी स्ट्रक्चरचा एक जड भाग अचानक खाली कोसळला आणि तो थेट सलमा पठाण यांच्या डोक्यावर आदळला.
या दुर्घटनेत सलमा गंभीर जखमी झाल्या. मात्र, दुखापत अत्यंत गंभीर असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आणि पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
मुलगा दहीहंडी मंडळाचा कार्यकर्ता
या घटनेतील आणखी एक भावनिक बाब म्हणजे सलमा पठाण यांचा मुलगा याच दहीहंडी मंडळात सक्रिय कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी मंडळाशी संबंधित व्यक्तींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती आहे.
मात्र, घटना गंभीर स्वरूपाची असल्याने पोलिसांनी या अपघाताची दखल घेतली आहे. कुटुंबीयांकडून तक्रार नोंदवण्यास नकार असला तरी घटनेची कायदेशीर प्रक्रिया आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून पुढील कार्यवाही केली जात आहे.
दहीहंडीच्या जल्लोषाला अपघाताची किनार
दरम्यान, आज ५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रभर दहीहंडी उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील विविध भागांत गोविंदा पथकांकडून हंडी फोडण्याची तयारी सुरू आहे. अनेक मंडळांनी यंदा मोठ्या रोख बक्षिसांची घोषणा केली आहे.
ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव यंदा विशेष चर्चेत असून, येथे तब्बल ७१ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी देखील मानाची दहीहंडी म्हणून ओळखली जाते. मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र हंड्या ठेवण्यात आल्या असून, विजेत्या पथकांना प्रत्येकी १ लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. महिलांच्या गोविंदा पथकासाठीही १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
मात्र, उत्सवाच्या या जल्लोषादरम्यान जुन्या सांगवीत घडलेल्या या दुर्घटनेने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दहीहंडीचे स्ट्रक्चर उभारताना आणि ते उतरवताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना किती महत्त्वाच्या आहेत, याची जाणीव या घटनेतून झाली आहे.