सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून परवानगीपेक्षा डबल साऊंड लावल्याने मंडळावर कारवाई; साऊंड सिस्टिमही जप्त
  • दहीहंडीचा लोखंडी सांगाडा डोक्यात कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू, जुन्या सांगवीतील खळबळजनक घटना
 शहर

मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल; परवानगीपेक्षा दुप्पट साऊंड लावणाऱ्या मंडळावर कारवाई, सिस्टिम जप्त

डिजिटल पुणे    05-09-2026 15:42:16

पुणे : राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत असतानाच पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. दहीहंडी कार्यक्रमासाठी दिलेल्या परवानगीच्या अटींचे उल्लंघन करत क्षमतेपेक्षा अधिक साऊंड सिस्टिमचा वापर करणाऱ्या बिबवेवाडी येथील श्रीकृष्ण तरुण मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवात ध्वनी प्रदूषणाच्या नियमभंगाप्रकरणी गुन्हा दाखल झालेले हे पहिले मंडळ असल्याची माहिती आहे.

बिबवेवाडी ओटा परिसरातील श्रीकृष्ण तरुण मंडळाला दहीहंडी कार्यक्रमासाठी पारंपरिक वाद्य वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. यावेळी लाऊड स्पीकरच्या वापराबाबत पोलिसांनी काही अटी घातल्या होत्या. त्यानुसार मंडळाला ४ बेस आणि ४ टॉप, म्हणजेच एकूण ८ स्पीकर वापरण्याची परवानगी होती.

मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमात मंडळाकडून परवानगीपेक्षा दुप्पट साऊंड सिस्टिम उभारण्यात आली. ८ बेस आणि ८ टॉप, असे एकूण १६ स्पीकर लावण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मोठ्या आवाजामुळे परिसरात ध्वनी प्रदूषण होत असल्याने नागरिकांना त्रास झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

परवानगीच्या अटींचा भंग; साऊंड सिस्टिम जप्त

पोलिसांकडून देण्यात आलेल्या लेखी आदेशाचे उल्लंघन करून अतिरिक्त साऊंड सिस्टिम लावल्याप्रकरणी मंडळावर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान संबंधित साऊंड सिस्टिम पोलिसांनी जप्त केली आहे.श्रीकृष्ण तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल प्रकाश जगताप असल्याची माहिती असून, त्यांच्या मंडळाविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांचा इशारा; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाबाबत आधीच स्पष्ट सूचना दिल्या होत्या. लाऊड स्पीकरच्या वापरासाठी निश्चित मर्यादा असतील आणि परवानगीपेक्षा अधिक साऊंड सिस्टिम लावल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला होता.त्यामुळे बिबवेवाडीतील मंडळावर झालेली कारवाई ही इतर दहीहंडी मंडळांसाठीही महत्त्वाचा इशारा मानली जात आहे.

राज्यातील अनेक शहरांत डीजेवर निर्बंध

दरम्यान, यंदाच्या दहीहंडी उत्सवात डीजे आणि ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. राज्यातील सोलापूर, नवी मुंबई, पनवेल, परभणी, संभाजीनगर, नागपूर आणि धुळे या शहरांमध्ये डीजेच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे उत्सवाचा जल्लोष आणि ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी याकडे पोलिसांचे विशेष लक्ष आहे.

विद्यानंद बापट प्रकरणानंतर ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून डीजेच्या मोठ्या आवाजाविरोधात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटनाही समोर आली होती. आता दहीहंडी उत्सवादरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर गुन्हा दाखल झाल्याने पुण्यातील ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती