म्हापसा : कामाच्या वेळेत झालेला किरकोळ वाद आणि त्यातून केलेली थट्टामस्करी एका २६ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना गोव्यातील राय-शिवोली परिसरात घडली. स्वतःला सुरी भोसकून घेण्याची मस्करीत धमकी देताना धारदार सुरी पोटात घुसल्याने पुण्याच्या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव रोहित प्रवीण जळगावकर (वय २६, मूळ रा. पुणे) असे आहे. रोहित हा हैदराबाद येथील एका मैत्रिणीसोबत राय-शिवोली येथील भाड्याच्या खोलीत राहत होता. दोघेही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत काम करत होते आणि घरूनच काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी सकाळी दोघेही नेहमीप्रमाणे काम करत असताना एका किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वादाच्या वेळी रोहितने स्वयंपाकघरातील धारदार सुरी हातात घेतली. मैत्रिणीला घाबरवण्याच्या आणि मस्करी करण्याच्या उद्देशाने तो स्वतःला सुरी भोसकून घेण्याचे बोलत होता.मात्र, पुढच्याच क्षणी ही थट्टा अनपेक्षित दुर्घटनेत बदलली. रोहितच्या हातातील सुरी त्याच्या पोटात घुसली आणि त्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.घाबरलेल्या मैत्रिणीने तातडीने मदतीसाठी आरडाओरड केली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने रोहितला उपचारासाठी शिवोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक पुरावे ताब्यात घेतले. घटनेच्या वेळी खोलीत उपस्थित असलेल्या रोहितच्या मैत्रिणीची पोलिसांनी चौकशी करून तिची जबानी नोंदवली आहे.या प्रकरणी हणजूण पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.किरकोळ वादाच्या क्षणी केलेली मस्करी आणि हातातील धारदार वस्तूचा निष्काळजीपणे केलेला वापर किती गंभीर परिणाम घडवू शकतो, हे या दुर्दैवी घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.