नागपूर : नागपुरात कौटुंबिक वादाला हिंसक वळण मिळाल्याने 38 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीमध्ये सुरू असलेल्या डान्स क्लासला जाण्याच्या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून पतीने पत्नीला मारहाण केल्याचा आरोप असून, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव यामिनी कृष्ण लाल यादव असून, पोलिसांनी तिचा पती कृष्ण लाल यादव याला अटक केली आहे.
जेवण बनवण्यावरून सुरू झाला वाद
पोलिसांच्या माहितीनुसार, कृष्ण लाल कामावरून घरी आल्यानंतर त्याने पत्नी यामिनीला स्वतःसह मुलांसाठी जेवण तयार करण्यास सांगितले. मात्र, त्यावेळी यामिनी सोसायटीतील डान्स क्लासला जाण्याच्या तयारीत होती. तिने स्वयंपाक करण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याचे तपासात समोर आले आहे.
दोन मुलांसमोर मारहाण केल्याचा आरोप
कृष्ण लाल हा घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने दोन मुलांसमोरच यामिनीच्या मानेवर आणि पोटावर मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीनंतर यामिनीला मानेसह पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर तिने पतीला वेदनाशामक औषध आणण्यास सांगितले.
मेडिकल बंद असल्याने औषध मिळाले नाही
यामिनीच्या सांगण्यावरून कृष्ण लाल औषध आणण्यासाठी मेडिकल दुकानात गेला. मात्र, दुकान बंद असल्याने त्याला औषध न घेताच परतावे लागले. दरम्यान, यामिनीची प्रकृती अधिकच खालावत गेली. तिच्या पोटाला सूज आली आणि वेदनाही वाढत गेल्या.
उपचारादरम्यान यामिनीचा मृत्यू
प्रकृती गंभीर झाल्यानंतर यामिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
शवविच्छेदन अहवालातून गंभीर दुखापतींचा खुलासा
शवविच्छेदन अहवालात यामिनीच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या दुखापती आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिच्या मानेचे हाड मोडल्याचे तसेच आतड्यांना गंभीर दुखापत झाल्याचे अहवालातून समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पोलिसांचा संशय पती कृष्ण लाल यादवकडे वळला.चौकशीनंतर पोलिसांनी कृष्ण लाल यादवला अटक केली असून, त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याला दोन लहान मुले असून, घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.