सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून परवानगीपेक्षा डबल साऊंड लावल्याने मंडळावर कारवाई; साऊंड सिस्टिमही जप्त
  • दहीहंडीचा लोखंडी सांगाडा डोक्यात कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू, जुन्या सांगवीतील खळबळजनक घटना
 जिल्हा

दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळून सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

डिजिटल पुणे    05-09-2026 17:59:01

मुंबई : राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच मुंबईतील मालवणी परिसरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमादरम्यान विटांचा कॉलम अचानक कोसळल्याने त्याखाली दबून 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मालाड पश्चिमेकडील चिकूवाडी, मालवणी, मार्वे रोड परिसरातील एकता वेल्फेअर सोसायटीमध्ये शनिवारी दुपारी सुमारे 3 वाजता स्थानिक पातळीवर दहीहंडीचा कार्यक्रम सुरू होता. काही मुले दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली.

दहीहंडीला बांधलेली दोरी आणि कॉलम कोसळला

प्राथमिक माहितीनुसार, दहीहंडी दोरीच्या साहाय्याने एका झाडाला तसेच तळमजल्यावरील बांधकामाच्या विटांच्या कॉलमला बांधण्यात आली होती. दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना अचानक दोरीवर ताण आला आणि विटांचा कॉलम कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

कॉलम कोसळल्याने त्याखाली रुद्र कदम (वय 7) हा मुलगा अडकला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्याला तातडीने मालवणी जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केल्याची प्राथमिक माहिती आहे.

पोलीस आणि पालिका प्रशासन घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलीस, पालिका कर्मचारी आणि वॉर्ड कंट्रोल रूमचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेची नेमकी कारणे, दहीहंडीच्या आयोजनाची पद्धत आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेनंतर दहीहंडी उत्सवाच्या आयोजनादरम्यान सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. धोकादायक किंवा कमकुवत बांधकामाचा वापर टाळणे तसेच नागरिक आणि विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे.मालवणीतील या दुर्घटनेमुळे उत्सवाच्या आनंदावर दुःखाची छाया पसरली असून, रुद्रच्या मृत्यूने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती