पुणे : श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट तुळशीबागकडून ‘गिरीकंधरा’ हा भव्य ४० फूट उंच देखावा सादर करण्यात येणार आहे. या देखाव्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे ते ११ फुटांचे ध्यानस्थ हनुमानाचे हवेत तरंगणारे रूप. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साकारण्यात येणारा हा अनुभव भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.पर्वताच्या अंतरंगात प्रवेश केल्यानंतर अनुभवायला मिळणारे अद्भुत विश्व, रामायणकालीन प्रसंग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अनोखा मेळ या देखाव्यात साधण्यात आला आहे.मंडळाचे अध्यक्ष सागर सुनील दहीभाते यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.यंदा मंडळाचे ६१ वे वर्ष असून यानिमित्ताने भव्य गणेशोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे. विश्रामबागवाडयासमोरून तुळशीबागेत जाणाऱ्या गल्लीच्या प्रारंभीच हे मंडळ असून भव्य सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
मंडळाचे अध्यक्ष सागर सुनील दहीभाते यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचेच कार्यकर्ते असलेले प्रसिद्ध कला दिग्दर्शक महेश कोरे, ऋषिकेश पोतदार,सिने कलाकार शरद कसबे यांनी तसेच प्रसिद्ध मूर्तिकार बिभीषण कातळे हा संपूर्ण देखावा उभा केला आहे.मंडप व्यवस्था बाळासाहेब गोपळे, प्रकाश व्यवस्था सचिन गोडावले यांनी केली आहे.दिवेश सोनी,क्षितिज कुंभार,मलेश कांबळे,सिद्धार्थ सातपुते,अरविंद तांदळे,शशिकांत बिडवे,पार्थ तडका,मनोज चिंचकर,दत्तात्रय कावरे,मयूर जाधव,मंगेश चिंचवडकर,रूपेश व्हावळ,ओम झरे,शुभम गोरे,गणेश कदम,गणेश दहीभाते,नरेश माळवे,परमेश्वर पवार,मोहन शिंदे,लालू ठक्कर,सोपान उमाजी,संकेत घुले आणी मंडळाचे सर्व कार्यकर्त परिश्रम घेत आहेत.
रामायणातील विविध प्रसंगही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, मात्र रामायणकालीन वातावरण आणि सौंदर्य कायम ठेवत सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे धार्मिक कथानकाचा पारंपरिक गाभा कायम ठेवत त्याला आधुनिक सादरीकरणाची जोड देण्यात आली आहे.‘गिरीकंधरा’मधील ‘रामतीर्थ’ हे भाविकांना भक्ती आणि अध्यात्माचा वेगळाच अनुभव देणार आहे. प्रकाशयोजना, ध्वनी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारलेल्या भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पा आणि प्रभू श्रीराम यांचा जयघोष अनुभवता येणार आहे.
गणेशोत्सवातील लहानग्यांसाठीही मंडळाने विशेष उपक्रम आखला आहे. यानिमित्ताने १ ते ५ वर्षे वयोगटातील पाच हजार बालभक्तांना ‘हनुमान अस्त्र’ म्हणून गदा वाटप करण्यात येणार आहे. हनुमानाच्या शौर्य, भक्ती आणि संस्कारांची ओळख बालमनाला व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.सामाजिक सेवा, पर्यावरण संवर्धन, अध्यात्म, भारतीय संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधणारा ‘गिरीकंधरा’ यंदा तुळशीबागच्या गणेशोत्सवाचे वेगळेपण अधोरेखित करणार आहे. उत्सव मोठा करण्यापेक्षा उत्सवातून समाजाला काहीतरी देण्याचा मंडळाचा प्रयत्न यंदाच्या गणेशोत्सवाची खरी ओळख ठरणार आहे.
उत्सवाची सुरुवातच सामाजिक उपक्रमाने
पारंपरिक गणेशोत्सवासाठी आणि समाजाभिमुख कामांसाठी श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट ओळखले जाते.उत्सवाची सुरुवातच सामाजिक उपक्रमाने करणाऱ्या मंडळाने पर्यावरण संवर्धनाचाही वेगळा मार्ग स्वीकारला आहे. परिसरातील व्यापाऱ्यांना प्लास्टिकच्या ग्लासातून चहा न पिण्याचा केवळ सल्ला न देता प्रत्यक्ष स्टीलचे ग्लास देण्यात आले. प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे पर्यावरण व आरोग्यविषयक प्रश्न लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे तुळशीबाग सारख्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही येणार्या भाविकांना तसेच पारंपरिक व्यावसायिक यांना कोणताही त्रास ना होता मंडप उभारण्यात आला आहे. यंदा 'पुणे परिवार' कडून आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार मंडळाचे अध्यक्ष सागर सुनील दहीभाते यांना प्रदान करण्यात आला आहे.
