सांगली : पलूस तालुक्यातील एका दाम्पत्याचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विषारी पदार्थाचे सेवन केल्यानंतर उपचार घेऊन घरी परतलेल्या पती-पत्नीची दुसऱ्याच दिवशी प्रकृती खालावली. त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. मनीषा संजय पाटील (४२) आणि संजय तात्यासो पाटील (४६) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय आणि मनीषा पाटील यांनी २ सप्टेंबर रोजी विषारी पदार्थाचे सेवन केले होते. त्यानंतर दोघांना तातडीने पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
रुग्णालयात सुमारे तीन दिवस उपचार घेतल्यानंतर दोघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे डॉक्टरांनी ५ सप्टेंबर रोजी दुपारी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. मात्र, घरी गेल्यानंतर अवघ्या एका दिवसातच दोघांना पुन्हा त्रास जाणवू लागला.
पुन्हा रुग्णालयात दाखल
६ सप्टेंबर रोजी सकाळी प्रकृती बिघडल्यानंतर नातेवाईकांनी दोघांना तातडीने पलूस ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी मनीषा पाटील यांची तपासणी केली. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. दुसरीकडे, संजय पाटील यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
एकाच दिवशी दोघांचा मृत्यू
पती-पत्नीचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरातही शोककळा पसरली आहे.दरम्यान, कर्जाच्या तगाद्यामुळे दाम्पत्याने विषारी पदार्थाचे सेवन केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.