पुणे : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित करण्यात आलेला लावणी नृत्यांगणा राधा पाटील हिचा कार्यक्रम आता आयोजकांच्या चांगलाच अंगलट आला आहे. आवश्यक प्रमाणपत्रे आणि परवानगी नसतानाही कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी राधा पाटीलसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दहीहंडी उत्सवात मनोरंजनाच्या कार्यक्रमांदरम्यान अश्लील नृत्यप्रकार सादर होऊ नयेत, यासाठी कलाकारांना रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती. संबंधित प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती.
असे असतानाही बिबवेवाडी परिसरात राधा पाटील हिच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दहीहंडी उत्सवासाठी राधा पाटीलला या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमातील नृत्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या व्हिडिओवरून राधा पाटीलच्या काही नृत्यहावभावांवर सोशल मीडियातून टीकाही करण्यात आली.
परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रम
कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली अधिकृत कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सादर करण्यात आली नसल्याने पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिली नव्हती. मात्र, त्यानंतरही कार्यक्रम पार पडल्याने आयोजकांसह नृत्य सादर करणाऱ्या कलाकारावर कारवाई करण्यात आली आहे.
राधा पाटीलसह तिघांची नावे
या प्रकरणी लावणी नृत्यांगणा राधा पाटील (रा. मुंबई), एम्पायर ग्रुप ए.के. बॉइजचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे (रा. सुखसागरनगर, कात्रज) आणि आयोजक अमोल काटे (रा. कात्रज) यांच्याविरोधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओचीही चर्चा
कार्यक्रमातील राधा पाटीलच्या नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही सोशल मीडिया युजर्सनी नृत्यात अश्लील हावभाव असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पोलिसांकडून कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भातील परवानगी, प्रमाणपत्रे आणि इतर बाबींची चौकशी सुरू आहे.या प्रकरणाचा पुढील तपास बिबवेवाडी पोलिसांकडून सुरू आहे.