गोंदिया : कामाच्या शोधात तेलंगणाच्या दिशेने निघालेल्या मजुरांच्या प्रवासाला नागरा गावाजवळ भीषण अपघाताने ब्रेक लागला. गोंदिया-बालाघाट महामार्गावर ट्रक आणि पीकअप वाहनाची जोरदार धडक होऊन सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात आणखी सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी (७ सप्टेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
कामासाठी तेलंगणाकडे निघाले अन् दुर्घटना घडली
मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर परिसरातील मजूर पीकअप वाहनातून तेलंगणातील जगतीहाल, करीमनगर येथे रोजगारासाठी जात होते. नागरा गावाच्या हद्दीत त्यांचे वाहन आले असताना गोंदियाकडून बालाघाटच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने पीकअपला जोरदार धडक दिली.
धडकेचा आवाज अन् घटनास्थळी हाहाकार
दोन्ही वाहनांची धडक इतकी तीव्र होती की पीकअप वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. सात जण गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
नागरिकांनी दाखवली तत्परता
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. गोंदिया ग्रामीण पोलिसांनीही तातडीने घटनास्थळ गाठले. वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या माध्यमातून केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मृतांमध्ये तीन वर्षांच्या बालकाचा समावेश
या अपघातात आरुष मात्रे (३, रा. सावरी), किरण संतोष वैद्ये (२६, रा. लोडाना), संतोष मात्रे (३८), सुशिला मात्रे (३५), रूपसेन सत्यकर (३५) आणि ज्योती सत्यकर (३२) यांचा मृत्यू झाला आहे.
सात जण जखमी
भुमेश्वर मात्रे (४७), संगीता मात्रे (३५), राजेंद्र पंचाले (३०), लक्ष्मी पंचाल (२७), संतोष वैद्ये (३८), राकेश बाहे (२४) आणि पीकअप चालक संदीप बाहे हे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
दुर्घटनेची माहिती मिळताच मृत आणि जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे बालाघाट जिल्ह्यातील संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान, मृत आणि जखमी प्रवासी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, गोंदिया ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दुर्घटनेमुळे गोंदिया-बालाघाट महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.