सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 शहर

कात्रज-कोंढवा रोडवर कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; १५ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, बहीण गंभीर

डिजिटल पुणे    08-09-2026 17:04:06

पुणे : कात्रज-कोंढवा रोडवर  मंगळवारी (८ सप्टेंबर) दुपारी सव्वा एकच्या सुमारास भीषण अपघात झाला. सिल्वर ओक सोसायटीसमोर कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तिची बहीण गंभीर जखमी झाली असून वडिलांनाही दुखापत झाली आहे. शाळा सुटल्यानंतर वडिलांसोबत घरी परतत असताना हा अपघात झाला.

कंटेनरच्या धडकेने तिघेही रस्त्यावर कोसळले

ज्ञानेश्वर नाईक हे आपल्या दोन मुली प्रतिभा आणि वैष्णवी यांना दुचाकीवरून घेऊन घरी जात होते. कात्रजकडून कोंढव्याच्या दिशेने जात असताना सिल्वर ओक सोसायटीसमोर त्यांच्या दुचाकीला भरधाव कंटेनरने मागून धडक दिली.धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील तिघेही खाली फेकले गेले. या दुर्घटनेत प्रतिभा ज्ञानेश्वर नाईक (वय १५, रा. गुजरवाडी रोड) हिला गंभीर दुखापत झाली. तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिची बहीण वैष्णवी नाईक गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वर नाईक यांनाही दुखापत झाली आहे.

घटनास्थळी पोलिसांची धाव

अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांनी अपघाताची माहिती घेतली.अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

वाहतूक काही काळ विस्कळीत

अपघातानंतर कात्रज-कोंढवा रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत खेडकर यांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

अपघातांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये संताप

कात्रज-कोंढवा रोडवर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. भरधाव अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याने वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.दरम्यान, शाळेतून घरी परतणाऱ्या दोन बहिणींना झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


 Give Feedback



 जाहिराती