कानपूर : कानपूरमधील करोडपती औषध व्यावसायिक विनीत मिनोचा यांच्या हत्येप्रकरणी तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला ही हत्या अज्ञात हल्लेखोरांनी केल्याचा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची हालचाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास पुढे गेल्यानंतर या प्रकरणात कुटुंबातीलच व्यक्तीची भूमिका असल्याचा संशय बळावला आहे. विनीत यांच्या ३० वर्षीय सुनेची भूमिका सध्या पोलिसांकडून तपासली जात आहे.
घटनेच्या रात्री विनीत यांची सून शालू, तिचा पती सुब्रत आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा पार्टीसाठी घराबाहेर गेले होते. त्यानंतर काही वेळात दोन संशयित व्यक्ती फ्लॅटमध्ये प्रवेश करताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्या. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हे दोघे विनीत घरी येण्यापूर्वीच घरात लपून बसले होते. विनीत घरी परतल्यानंतर काही वेळात त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला.
या प्रकरणाच्या तपासात विनीत यांच्या घरी पूर्वी काम करणाऱ्या एका माजी नोकराचे नावही समोर आले आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी चोरीच्या आरोपावरून त्याला कामावरून हटवण्यात आले होते. मात्र, त्याला घराची रचना, कुटुंबातील सदस्यांच्या दिनचर्येची तसेच त्यांच्या हालचालींची माहिती होती. विशेष म्हणजे त्याच्याकडे घराची डुप्लिकेट चावी असल्याचेही तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आर्थिक कारणातून हत्येचा कट?
पोलिसांच्या माहितीनुसार, विनीत मिनोचा हे मुलगा आणि सुनेच्या खर्चावर नियंत्रण ठेवत होते. त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर असलेल्या निर्बंधांमुळे कुटुंबात नाराजी निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर विनीत यांच्या हत्येचा कट रचण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.
६ लाख रुपयांची सुपारी?
तपासादरम्यान विनीत यांच्या हत्येसाठी ६ लाख रुपयांची सुपारी देण्याचे ठरल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या कटात सुनेची नेमकी भूमिका काय होती, माजी नोकराचा सहभाग किती होता आणि हल्लेखोरांशी त्यांचा संपर्क कसा झाला, याचा तपास सध्या सुरू आहे.
दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण, कटाची आखणी कोणी केली आणि त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. उपलब्ध पुरावे आणि चौकशीतून समोर येणाऱ्या माहितीनंतरच या प्रकरणाचे संपूर्ण गूढ उकलणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.