पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे प्रशासनाने मद्यविक्रीवर विशेष निर्बंध लागू केले आहेत. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता कायम राहावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
प्रशासनाच्या आदेशानुसार १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. काही भागांत संपूर्ण दिवस मद्यविक्रीवर बंदी राहणार असून, विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मिरवणूक संपेपर्यंत मद्यविक्रीची दुकाने आणि संबंधित आस्थापने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
१४ सप्टेंबरला संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद
१४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी पुणे-१ राज्य उत्पादन शुल्क कार्यक्षेत्रात दिवसभर मद्यविक्री बंद राहणार आहे. त्यामुळे या दिवशी संबंधित परवानाधारक आस्थापनांना मद्यविक्री करता येणार नाही. गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरही निर्बंध
गणेशोत्सवातील विविध दिवसांमध्ये ज्या भागातून गणेश विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत, त्या भागातील मिरवणूक मार्गावर मद्यविक्रीला निर्बंध राहणार आहेत. विशेषतः गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सहाव्या दिवशी संबंधित मिरवणूक मार्गावर मिरवणूक संपेपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.याशिवाय २६ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश विसर्जनाच्या मिरवणुका पूर्ण होईपर्यंत संबंधित भागातील मद्यविक्री आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक मार्गावर मद्यविक्री करणाऱ्या आस्थापनांना प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे लागणार आहे.
खडक, विश्रामबाग आणि फरासखाना भागांमध्ये विशेष लक्ष
पुणे पोलीस आयुक्तालयातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीचा आदेशात विशेष उल्लेख करण्यात आला आहे. या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित निर्बंध लागू राहणार आहेत. तसेच २६ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत संबंधित मार्गांवरील मद्यविक्री बंद ठेवली जाणार आहे.गणेशोत्सवाच्या काळात या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक आणि गणेशभक्तांची गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
प्रशासनाकडून गणेशोत्सवाची जोरदार तयारी
दरम्यान, गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी पुणे प्रशासन आणि महापालिकेने विविध पातळ्यांवर तयारी सुरू केली आहे. पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, महिला सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि कायदा-सुव्यवस्था यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांसह जिल्हाधिकारी, मेट्रोचे अधिकारी आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली. गणेश मंडळांचे मंडप, रस्त्यांवरील खड्डे, प्रकाश व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित उपाययोजनांची तपासणी करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक नियोजन, पोलिस बंदोबस्त आणि आपत्कालीन सेवा यांच्याबाबतही प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनी तसेच मद्यविक्री आस्थापनांनी प्रशासनाने जारी केलेल्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.