तळेगाव दाभाडे : देहूजवळील भंडारा डोंगर परिसरात एकटी आढळलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. मुलीला तिच्या आई-वडिलांनीच डोंगरावर सोडल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुलगी मुंबईत सापडल्याचा बनाव रचल्याचेही चौकशीत समोर आले. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डोंगरावर एकटी सापडली चिमुकली
६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास भंडारा डोंगर परिसरात दीड ते दोन वर्षांची बालिका एकटीच आढळून आली. निर्जन भागात एवढ्या लहान मुलीला कोणी सोडले, ती हरवली आहे की तिच्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत सुरुवातीला पोलिसांसमोर अनेक प्रश्न होते.पोलिसांनी तत्काळ मुलीला ताब्यात घेतले आणि तिची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले.
पालकांचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन
चिमुकलीच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दरम्यान, डॉ. प्रकाश कोयाडे यांनी सोशल मीडियावर मुलीची माहिती प्रसारित करत पालकांचा शोध घेण्यासाठी आवाहन केले. हे आवाहन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.चिमुकलीची अवस्था पाहून डॉक्टर आणि पोलिस कर्मचारीही भावुक झाले. तिची देखभाल करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनाही या घटनेबद्दल बोलताना अश्रू अनावर झाले.
आई-वडील अखेर पोलिसांसमोर हजर
तपास सुरू असतानाच चिमुकलीचे आई-वडील सोमवारी सायंकाळी स्वतःहून तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी मुलगी मुंबईत आढळल्याचा दावा केला. मात्र पोलिसांनी त्यांच्या माहितीची पडताळणी करत सखोल चौकशी केली असता या कथनातील विसंगती समोर आल्या.त्यानंतर चौकशीत त्यांनीच चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आर्थिक अडचणींमुळे घेतल्याचे सांगितले पाऊल
मुलीचा सांभाळ करण्यासाठी आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे पालकांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे एखाद्या दानशूर व्यक्तीला किंवा चांगल्या कुटुंबाला मुलगी सापडेल आणि तिचा योग्य सांभाळ केला जाईल, अशी अपेक्षा होती. त्यातूनच तिला डोंगरावर सोडल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसांच्या माहितीनुसार, अजय यादव हा कामगार असून खुशबू यादव गृहिणी आहे. दोघेही वासुली परिसरात राहत असून त्यांचे मूळ उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगण्यात आले.
कलम ९३ आणि कलम ७५ अंतर्गत कारवाई
चिमुकलीशी क्रूरतेने वागून तिचा परित्याग केल्याप्रकरणी अजय प्रकाश यादव आणि खुशबू अजय यादव यांच्याविरुद्ध तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ९३ तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम ७५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी या प्रकरणाची माहिती दिली. मुलीला डोंगरावर सोडण्यामागे आर्थिक परिस्थितीव्यतिरिक्त अन्य काही कारण होते का, याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.
चिमुकली सुरक्षित; डीएनए तपासणीनंतर पुढील निर्णय
सध्या चिमुकली वायसीएम रुग्णालयात सुरक्षित असून तिच्यावर वैद्यकीय देखरेख सुरू आहे. तिच्या पालकत्वाची खात्री करण्यासाठी डीएनए तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून चिमुकलीची बालगृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.