पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत विविध जलकेंद्रांमध्ये विद्युत तसेच स्थापत्यविषयक तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (१० सप्टेंबर) शहरातील मोठ्या भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच दुरुस्तीच्या कामानंतर शुक्रवारी (११ सप्टेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.
या भागांना पाणीबंदचा फटका
पर्वती एचएलआर टाकी, भामा आसखेड, एसएनडीटी (एचएलआर), चांदणी चौक, गांधी भवन, पॅनकार्ड क्लब जीएसआर, वारजे जलकेंद्र, पाषाण-सूस गोल टाकी, चतु:शृंगी टाकी, जुने वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, कोंढवे-धावडे तसेच वडगाव जलकेंद्रांतर्गत येणाऱ्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पर्वती परिसर
पर्वती एचएलआर टाकीअंतर्गत सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर, शिवतेजनगर, अप्पर व लोअर इंदिरानगर, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, डोले मळा, सॅलिसबरी पार्क आणि पर्वती गावठाण या भागांना पाणीबंदचा परिणाम जाणवणार आहे.
पूर्व पुण्यातील अनेक भाग प्रभावित
भामा आसखेड जलकेंद्रामुळे लोहगाव, कळस, धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खराडी तसेच आळंदी परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
औंध-बाणेरसह पश्चिम पुण्यातही पाणीबंद
एसएनडीटी जलकेंद्रांतर्गत गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर, लॉ कॉलेज रस्ता, महाबळेश्वर हॉटेलपर्यंतचा परिसर, बाणेर रस्ता, बीएमसीसी कॉलेज रस्ता, आयसीसी रोड आणि सेनापती बापट रस्ता परिसरातील नागरिकांना पाणीबंदचा सामना करावा लागणार आहे.
कोथरूड-पाषाण परिसराचाही समावेश
चांदणी चौक टाकीअंतर्गत पाषाण, भुगाव रस्ता, कोकाटे वस्ती, स्टेटन हिल सोसायटी, बावधन, सुतारवाडी, नऱ्हे-म्हाळुंगे परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील. गांधी भवन टाकीअंतर्गत कोथरूड, कर्वेनगर, वारजे माळवाडी, शिवप्रभा परिसर आणि कर्वे रोड परिसर प्रभावित होणार आहे.
दक्षिण पुण्यातील भागांवरही परिणाम
वडगाव जलकेंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या दत्तनगर, टेल्को कॉलनी, संतोषनगर, धायरी, आंबेगाव, धनकवडी, कोंढवा, कात्रज आणि येवलेवाडी परिसरातही गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन
देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. शुक्रवारी पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत काही भागांत कमी दाबाने किंवा उशिराने पाणी येण्याची शक्यता आहे.