सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 जिल्हा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी राज्यात प्रथमच भव्य ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळा’ – मंत्री पंकजा मुंडे

डिजिटल पुणे    09-09-2026 17:48:13

मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश व्यापक प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे नवी मुंबई येथे ‘पर्यावरणपूरक महा गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. सहा ते सात हजार शालेय विद्यार्थी आणि नागरिक एकाच वेळी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणार असून, राज्यातील हा अशा स्वरूपाचा पहिलाच उपक्रम आहे, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.ही कार्यशाळा १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते कार्यशाळेचा शुभारंभ होईल.

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख उत्सव आहे. गणरायाची पूजा म्हणजे निसर्गाचीच पूजा मानली जाते. गणेशपूजेत विविध वृक्षांची पाने अर्पण करण्याची परंपरा आहे. पूर्वी लाल किंवा शाडूच्या मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर होत असे. मात्र, कालांतराने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि रासायनिक रंगांचा वापर वाढल्यामुळे विसर्जनानंतर पाण्याचे प्रदूषण होते. पाण्यात शिसे, ॲल्युमिनियमसारखे जड धातू मिसळल्याने जलचरांनाही धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती केली जात आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेला पुढे नेण्यासाठी एकाच ठिकाणी हजारो विद्यार्थी आणि नागरिकांना एकत्र आणून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक मूर्तींचा संदेश मोठ्या प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी विद्यार्थी आणि नागरिक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारणार आहेत. वर्षभरातील सर्व सण व उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावेत, यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे गेल्या दोन दशकांपासून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी विविध स्पर्धा आणि उपक्रमही राबविले जात आहेत.

ठाणे, पनवेल, खारघर, उलवे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील शाळांमधील साडेपाच ते सहा हजार विद्यार्थी व नागरिक या कार्यशाळेत सहभागी होतील. या उपक्रमामुळे राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि शैक्षणिक संस्थांनाही अशा पद्धतीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असेही मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.कार्यशाळेस उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 


 Give Feedback



 जाहिराती