सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 जिल्हा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    10-09-2026 18:07:46

 ठाणे : गणेशमूर्तीच्या भव्यतेपेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्व असून, गणेशोत्सवासारखा सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘पर्यावरणपूरक महा गणेश मूर्ती कार्यशाळा २०२६’ मध्ये ते बोलत होते. या भव्य कार्यशाळेत एकाच वेळी तब्बल १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती करून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये महाराष्ट्राच्या नावावर नवा जागतिक विक्रम नोंदवला.

या ऐतिहासिक सोहळ्याला पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, वनमंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रवींद्र फाटक, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि कला संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, गणराया ही बुद्धीची देवता असून आपल्या संस्कृतीत पर्यावरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. सृष्टीची निर्मिती करणाऱ्या पंचमहाभूतांचे रक्षण झाले तरच मानवी जीवन सुरक्षित राहू शकते. मोठ्या गणेशमूर्ती, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि कृत्रिम रंगांमुळे जलस्रोतांचे होणारे नुकसान टाळण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, मूर्ती लहान असो वा मोठी, भक्ती सारखीच असते. ईश्वराचा आशीर्वाद हा मूर्तीच्या आकारावर नव्हे, तर आपण पर्यावरण आणि समाजाची किती निस्वार्थ सेवा करतो यावर ठरतो.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या परीक्षकांनी निकाल जाहीर करताच मुख्यमंत्र्यांनी या यशाचे खरे शिलेदार सहभागी विद्यार्थी असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यावरण विभाग, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि कला संचालनालयाच्या प्रयत्नांची विशेष प्रशंसा केली. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना सांगितले की, शाडू मातीपासून बाप्पा घडवणाऱ्या या हजारो विद्यार्थ्यांनी स्वतःला ‘वसुंधरा रक्षक’ म्हणून सिद्ध केले आहे. संस्कृती जपत पर्यावरण रक्षणाचा हा संदेश घराघरात पोहोचविणे हाच या उपक्रमाचा मूळ हेतू आहे.

ढोल-ताशांच्या मंगल गजरात आणि मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या कार्यशाळेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः शाडू माती हातात घेऊन गणेशमूर्ती साकारली. राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाला आपल्यासोबत मूर्ती घडवताना पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. आपण स्वतः करू शकतो तर प्रत्येक कुटुंबही पर्यावरणपूरक बाप्पा साकारू शकते, असा ठाम आणि प्रत्यक्ष कृतीतून दिलेला संदेश या उपक्रमाने संपूर्ण समाजाला दिला.शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, कला क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापक आणि हजारो गणेशभक्तांच्या साक्षीने हा जागतिक विक्रम आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर अत्यंत दिमाखात संपन्न झाला.


 Give Feedback



 जाहिराती