छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे अन्नविषबाधेची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरच्या घरी बनवलेली खिचडी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. उपचारादरम्यान दोन वर्षीय आयुष नारायण थोटे या चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर त्याची सात वर्षीय बहीण गायत्री हिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण थोटे, त्यांची पत्नी देवशाला, मुलगी गायत्री आणि मुलगा आयुष यांनी मंगळवारी रात्री घरी खिचडी खाल्ली होती. त्यानंतर बुधवारी पहाटेपासून चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला कुटुंबीयांनी स्थानिक पातळीवर उपचार घेतले.
मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने चौघांनाही गावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सिल्लोड येथे हलवण्याचा सल्ला दिला. सिल्लोडला नेत असतानाच गुरुवारी पहाटेच्या सुमारास आयुषची प्रकृती अधिक बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला.
चिमुकल्या आयुषच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, सात वर्षीय गायत्रीची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नारायण थोटे आणि त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. या घटनेमुळे चिंचोली लिंबाजी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अन्नविषबाधेच्या या घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत तपासाची आवश्यकता आहे.