सातारा : आर्चरीच्या मैदानावर आपल्या दमदार कामगिरीने देशात साताऱ्याचा नावलौकिक वाढविणारी अर्जुन पुरस्कार विजेती कु. आदिती गोपीचंद स्वामी हिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. महाराष्ट्र शासनाने अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंच्या थेट नियुक्ती धोरणांतर्गत आदिती स्वामी हिची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी (प्रशिक्षण), गट-अ या पदावर थेट नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने ९ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भात शासन आदेश जारी केला. अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचे सुधारित धोरण २०२४ मध्ये निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर थेट नियुक्तीसाठी १३ पदे निर्माण करण्यास ८ सप्टेंबर २०२६ रोजी मान्यता देण्यात आली.
या प्रक्रियेत अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गट-अ पदासाठी पात्र ठरलेल्या सहा खेळाडूंची शिफारस केली. या शिफारस यादीत आदिती स्वामी हिच्या नावाचा समावेश असून, तिची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी (प्रशिक्षण), गट-अ या पदावर अस्थायी स्वरूपात थेट नियुक्ती प्रस्तावित करण्यात आली आहे.
शेरेवाडी, ता. सातारा या छोट्याशा गावातून आलेल्या आदितीने आर्चरीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत देशासह सातारा जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीची आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेत शासनाने तिला थेट गट-अ पदाची संधी दिली आहे.
मैदानावर देशासाठी पदके जिंकणाऱ्या आदितीच्या कर्तृत्वाला आता महाराष्ट्र शासनाच्या सेवेत नवी दिशा आणि जबाबदारी मिळणार आहे. तिच्या या नियुक्तीमुळे साताऱ्यातील क्रीडा क्षेत्रातून आनंद व्यक्त होत असून, राज्यातील युवा खेळाडूंनाही मोठी प्रेरणा मिळणार आहे.जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर खेळातूनही उज्ज्वल करिअर घडवता येते, याचे आदिती स्वामी हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.