बारामती : घरातील काही कारणांमुळे आई-वडिलांना न सांगता मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या तरुणीचा बारामती शहर पोलिसांनी शोध घेत तिला सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. महिला पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या संवेदनशील समुपदेशनादरम्यान तरुणीने तिच्यासोबत घडलेल्या काही गंभीर बाबी पोलिसांना सांगितल्या. त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीची स्वतंत्रपणे पडताळणी करत पुढील कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू केली.
तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १० सप्टेंबर रोजी नोंद झालेल्या या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तांत्रिक तसेच मानवी माहितीच्या आधारे तरुणीचा शोध घेतला.
पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या समन्वयातून महिला पोलिस हवालदार मोनिका मोहिते आणि ज्योती डिसले यांनी तरुणीशी संवाद साधला. तिच्यावर कोणताही दबाव न आणता विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात आले. यावेळी तरुणीने कुटुंबीयांच्या ओळखीतील एका व्यक्तीने तिच्याशी जवळीक वाढवून स्वतंत्र मोबाईल दिल्याचे सांगितले. फोन आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क ठेवत तिचा विश्वास संपादन केल्यानंतर वैयक्तिक छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.
या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने सामाजिक संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगणाऱ्या आणखी एका तरुणाने तिच्याशी संपर्क वाढविल्याची माहिती समोर आली. मदत आणि संरक्षणाचे आश्वासन देत त्याने प्रेम व्यक्त करून लग्नाचे आश्वासन दिल्याचेही तरुणीने चौकशीत सांगितले.
कुटुंबापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न?
पोलिसांच्या तपासात तरुणीला स्वतंत्र खोलीत ठेवून तिला आई-वडिलांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाल्याची बाब समोर आली. तसेच तिच्या आई-वडिलांपासून धोका असल्याचे भासवणारा अर्ज तयार करण्याचा प्रयत्न झाल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. या बाबींची सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि विधिज्ञ यांच्या उपस्थितीत पडताळणी करण्यात आली.
पोलिसांनी या प्रकरणात कोणताही घाईघाईचा निर्णय न घेता तरुणीची बाजू स्वतंत्रपणे जाणून घेतली. संबंधित व्यक्तीकडूनही स्पष्टीकरण घेण्यात आले. उपलब्ध माहिती आणि जबाबाच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आवश्यक नोंदी करण्यात आल्या आहेत.
अखेर आई-वडिलांकडे परतण्याचा निर्णय
समुपदेशनादरम्यान पोलिसांनी तरुणीला सुरक्षित पर्याय समजावून सांगितले. घराबाहेर असताना निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांची माहिती देतानाच तिच्या आई-वडिलांशीही स्वतंत्रपणे संवाद साधण्यात आला. मुलीवर कोणताही दबाव आणू नये आणि तिच्याशी संयमाने वागावे, अशी सूचना पोलिसांनी पालकांना केली.
दीर्घ संवादानंतर तरुणीने स्वतःच्या इच्छेने आई-वडिलांसोबत घरी जाण्याचा निर्णय घेतला. मुलगी सुखरूप परतल्याने अनेक तास चिंतेत असलेल्या पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आईच्या मिठीत विसावलेली मुलगी आणि पालकांच्या चेहऱ्यावर परतलेले समाधान हा या प्रकरणातील भावनिक क्षण ठरला.
मिसिंग व्यक्तीचा शोध लागल्यानंतर केवळ तिला घरी पोहोचवणे पुरेसे नसते, तर ती व्यक्ती घरातून बाहेर पडण्यामागे दबाव, फसवणूक किंवा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होता का, याचीही पडताळणी महत्त्वाची असते. या प्रकरणात महिला पोलिसांनी विश्वासाचे वातावरण निर्माण करून तरुणीची बाजू समजून घेतल्याने अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आणि तिला सुरक्षितपणे कुटुंबीयांकडे परतण्याचा मार्ग मिळाला.