सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 विश्लेषण

रेशनच्या तांदळात आढळली दातांची कवळी;आढळलेले दात मानवी की प्राण्यांचे? तपास सुरू,धाराशिव जिल्ह्यात खळबळ

डिजिटल पुणे    12-09-2026 19:10:33

धाराशिव  : धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील जेवळी येथे रेशनच्या तांदळात दातांची कवळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वस्त धान्य दुकानातून आणलेल्या तांदळाची निवड करत असताना हा प्रकार निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आढळलेले दात मानवी आहेत की प्राण्याचे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

जेवळी येथील भागाबाई बाबुराव बिराजदार यांनी शुक्रवारी (ता. ११) गणेश प्राथमिक सहकारी ग्राहक भांडाराच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातून रेशनचे धान्य घेतले होते. सायंकाळी त्यांच्या सुनेने भात बनविण्यासाठी तांदूळ चाळणीत घेतला. त्यावेळी तांदळामध्ये सहा ते सात दातांचा संच आढळून आला.

हा प्रकार लक्षात येताच बिराजदार कुटुंबीयांनी तातडीने शेजारी व नागरिकांना याची माहिती दिली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र देसाई आणि पांडुरंग बिराजदार यांनीही या प्रकाराची दखल घेतली.आढळलेले दात काही प्रमाणात खराब अथवा कुजलेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे दात नेमके मानवी आहेत की एखाद्या प्राण्याचे, याबाबत अधिकृत तपासणीनंतरच स्पष्टता होणार आहे.

दरम्यान, रेशनच्या धान्याच्या गुणवत्तेबाबत यापूर्वीही नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. खराब, किडलेले किंवा आळ्या-जाळ्या झालेले धान्य मिळत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तांदळात दात सापडल्याच्या प्रकारामुळे प्रशासनाच्या धान्य तपासणी व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, संबंधित धान्याची तातडीने तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच नागरिकांना वितरित होणाऱ्या धान्याची गुणवत्ता तपासल्यानंतरच त्याचा पुरवठा करावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.

प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन

याप्रकरणी योग्य ती चौकशी करण्यात येईल, तसेच खराब धान्य आढळल्यास ते तत्काळ परत घेऊन नवीन धान्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित स्वस्त धान्य दुकानदार आणि पुरवठादारांना देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान, तांदळात सापडलेले दात नेमके मानवी आहेत की प्राण्याचे, याचा तपास झाल्यानंतरच या प्रकरणाचे खरे स्वरूप स्पष्ट होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती