सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 DIGITAL PUNE NEWS

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुक्ताई पतसंस्थेची प्रेरणादायी परंपरा कायम वार्षिक सर्वसाधारण सभा व सत्कार सोहळा उत्साहात; इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना प्रेरणा

गजानन मेनकुदळे    14-09-2026 10:20:49

नायगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची परंपरा मुक्ताई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने यंदाही कायम ठेवली. संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृह, नायगाव येथे मुक्ताई पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आणि प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, सभासद, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. श्री. इंद्रजीत देशमुख (काकाजी) यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार, कष्ट, सकारात्मक विचार आणि ध्येय निश्चितीचे महत्त्व आपल्या ओघवत्या व प्रभावी शैलीत समजावून सांगितले. जीवनात यश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला.

विद्यार्थ्यांच्या यशात पालकांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असल्याने यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला. सत्कार स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि पालकांच्या चेहऱ्यावर झळकणारा अभिमान हा सोहळ्याचा विशेष क्षण ठरला.

‘विना सहकार नाही उद्धार’ या ब्रीदवाक्याला अनुसरून कार्यरत असलेली मुक्ताई पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी केला जाणारा गौरव हा संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा आणि शिक्षणाला दिलेल्या प्रोत्साहनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

यावेळी ह.भ.प. दिनकर बाबा महाराज, मा. श्री. बाळकृष्ण तांबारे, मा. श्री. उद्धव बाजीराव शितोळे, धर्मराज काळमाते यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. महादेवी लखन मेनकुदळे, संचालक मंडळ, कर्मचारी, सभासद आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव मेनकुदळे यांनी केले. सूत्रसंचालन आप्पासाहेब गोरे यांनी केले, तर नवनाथ गोरे यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, पालक, सभासद व ग्रामस्थांचे आभार मानले.

ज्ञान, संस्कार आणि सहकार यांचा सुंदर मिलाफ घडवून आणणारा हा सोहळा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला.


 Give Feedback



 जाहिराती