पुणे : ‘ॐ नमस्ते गणपतये’, ‘ॐ गं गणपतये नमः’ आणि ‘मोरया मोरया’च्या जयघोषाने ऋषिपंचमीच्या दिवशी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसर भक्तीमय झाला. तब्बल 35 हजारांहून अधिक महिलांनी एकत्र येत सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. पारंपरिक वेशभूषेतील महिलांची उपस्थिती, शंखनाद आणि मंत्रोच्चारांनी संपूर्ण परिसरात भक्तीचा आणि स्त्रीशक्तीचा जागर पाहायला मिळाला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या 134 व्या वर्षानिमित्त या भव्य अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे यंदाचे 41 वे वर्ष होते. उत्सव मंडपासमोर उभारण्यात आलेल्या ‘प्रेम मंदिरा’च्या प्रतिकृतीसमोर हा सोहळा पार पडला.
पावसाचे वातावरण असतानाही महिलांचा उत्साह कायम होता. मध्यरात्री दोन वाजल्यापासूनच महिला दगडूशेठ मंदिर परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली. पहाटेपर्यंत गर्दी वाढत गेली आणि उत्सव मंडपापासून नाना वाड्यापर्यंत महिलांची मोठी उपस्थिती दिसून आली. पुण्यासह मुंबई, सातारा, कोल्हापूर, लातूर यांसह विविध शहरांतून महिला या सोहळ्यासाठी पुण्यात आल्या होत्या.
शंखनादाने झाली सुरुवात; ओंकार जपाने वातावरण भारावले
कार्यक्रमाची सुरुवात महिलांच्या सामूहिक शंखनादाने झाली. त्यानंतर ओंकार जप करण्यात आला. ‘गणराजा गणनायका...’ आणि ‘मोरया रे बाप्पा मोरया रे...’ या गणेशगीतांच्या सादरीकरणाने वातावरण अधिकच भक्तिमय झाले. त्यानंतर हजारो महिलांनी एकाच सुरात अथर्वशीर्षाचे पठण केले. हजारो महिलांच्या मुखातून निघणाऱ्या मंत्रोच्चारांनी दगडूशेठ गणपती परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.
अथर्वशीर्ष पठणानंतर ‘मोरया मोरया, दगडूशेठ मोरया’च्या जयघोषात गणरायाला नमन करण्यात आले. त्यानंतर महाआरती करण्यात आली. महिलांनी टाळ्यांचा गजर करत आणि हात उंचावून बाप्पाप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.
दहा वर्षांपासून महिलांचा सहभाग
या उपक्रमात गेल्या दहा वर्षांपासून सहभागी होणाऱ्या दिपाली यांनी सांगितले की, मध्यरात्रीपासूनच महिलांची गर्दी सुरू होते. ओंकार जप, अथर्वशीर्ष पठण आणि आरतीमुळे निर्माण होणारे वातावरण मनाला प्रसन्नता देणारे असते. दोन-तीन तास कधी निघून जातात हे समजतही नाही. या सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर वर्षभराचे समाधान मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
बुधवार पेठ परिसरातील कांचन अनवेकर यादेखील गेल्या दहा वर्षांपासून या उपक्रमात सहभागी होत आहेत. वर्षभर या अथर्वशीर्ष पठण सोहळ्याची प्रतीक्षा असते आणि पुन्हा कधी या भक्तिमय वातावरणात सहभागी होता येईल, याची उत्सुकता असते, असे त्यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव तसेच सुवर्णयुग तरुण मंडळाचे सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, सचिन आखाडे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते.
ऋषिपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमोर झालेल्या या भव्य सोहळ्यात भक्ती, संस्कृती, परंपरा आणि स्त्रीशक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. हजारो महिलांच्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने पुण्याच्या गणेशोत्सवातील या सोहळ्याने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले.