सांगली : गणेशोत्सवाच्या उत्साहात सांगलीच्या पटवर्धन राजघराण्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्सवमूर्तीची आरती अभिनेत्री आणि राजकन्या भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी केल्याने संस्थानच्या उत्तराधिकारी पदाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नूतन युवराज आदित्यराजे पटवर्धन यांना डावलून भाग्यश्री यांनी आरती केल्याचा दावा करण्यात येत असून, या प्रकारानंतर मंदिर परिसरात चर्चांना उधाण आले.
चार वर्षांनंतर सांगलीत आलेल्या भाग्यश्री यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी उत्सवमूर्तीची आरती केली. यावेळी संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि भाग्यश्री यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरतीचा मान नेमका कोणाला, यावरून हा वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
आरतीच्या मानावरून नेमका वाद कसा झाला?
गणेश चतुर्थीला उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना होणार असल्याने आरतीची तयारी करण्यात आली होती. यासाठी नूतन युवराज आदित्यराजे पटवर्धन यांना बोलावण्यात आले होते. मात्र, आदित्यराजे येण्यापूर्वी किंवा त्यांना थांबवून भाग्यश्री यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आरती केल्याचे सांगण्यात येते.
आरतीनंतर भाग्यश्री यांनी हा मान आपल्याला असल्याचा दावा केल्याची माहिती आहे. मात्र, या कृतीवर त्यांचे वडील श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी नाराजी व्यक्त केली. संस्थानच्या परंपरेनुसार आरतीचा मान आदित्यराजे यांनाच असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
आदित्यराजेच उत्तराधिकारी असल्याचा दावा
विजयसिंहराजे पटवर्धन यांनी आदित्यराजे यांना राजकुमार म्हणून घोषित केले असून, तेच संस्थानचे पुढील उत्तराधिकारी असतील, असे स्पष्ट केले आहे. तसेच भाग्यश्री आणि त्यांचे पती हिमालय दासानी यांच्यासोबत संस्थानच्या मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये, असेही त्यांनी सांगितल्याचे समोर आले आहे.भाग्यश्री आणि हिमालय दासानी यांच्यावर संस्थानच्या कारभारातील गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर त्यांच्याकडील अधिकार काढून घेण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
वादाची पार्श्वभूमी काय?
गणपती पंचायतन संस्थानच्या व्यवस्थापनावरून यापूर्वीही पटवर्धन कुटुंबात मतभेद झाल्याचे सांगितले जाते. काही वर्षांपूर्वी संस्थानच्या कारभाराची जबाबदारी हिमालय दासानी यांच्याकडे होती. मात्र, संस्थानच्या जमिनींच्या व्यवहारावरून आरोप झाल्यानंतर त्यांच्याकडील अधिकार काढून घेण्यात आले.2016 ते 2021 या काळात विजयसिंहराजे पटवर्धन यांनी संस्थानचा कारभार पाहिला. त्यानंतर 2021 मध्ये संस्थानची सूत्रे जयदीप अभ्यंकर यांच्याकडे सोपवण्यात आली.यानंतर 2023-24 मध्ये जयदीप अभ्यंकर यांचा मुलगा आदित्य याला विजयसिंहराजे यांनी दत्तक घेतले आणि त्याची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे सांगितले जाते. सध्या आदित्यराजे यांचे वय 16 वर्षे आहे.
आता वाद कुठे पोहोचणार?
एकीकडे विजयसिंहराजे पटवर्धन यांनी आदित्यराजे हेच संस्थानचे पुढील उत्तराधिकारी असल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसरीकडे भाग्यश्री पटवर्धन यांनी आरतीचा मान घेतल्याने त्यांच्या अधिकारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.त्यामुळे गणपती पंचायतन संस्थानचा उत्तराधिकारी नेमका कोण? भाग्यश्रींचा आरतीचा अधिकार काय? आणि आदित्यराजेंच्या उत्तराधिकारी पदाची कायदेशीर स्थिती काय? या प्रश्नांमुळे सांगलीच्या राजघराण्यातील वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.आरतीच्या एका प्रसंगाने सुरू झालेला हा वाद आता केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता संस्थानच्या अधिकार आणि उत्तराधिकारी पदाच्या प्रश्नापर्यंत पोहोचला आहे.