मुंबई : कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेले भाजपचे आमदार पराग शाह सध्या एका अनोख्या प्रयोगामुळे चर्चेत आले आहेत. घाटकोपर पूर्व मतदारसंघातील रस्त्यांवर शाह चक्क भिकाऱ्याच्या वेशात फिरताना दिसले. एवढंच नाही, तर त्यांनी आपली ओळख लपवून नागरिकांकडे भिक्षाही मागितली. त्यांच्या या प्रयोगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यामागचा नेमका उद्देश काय, याची चर्चा सुरू झाली आहे.
पराग शाह यांनी या प्रयोगासाठी आमदार म्हणून मिळणारी सुरक्षा, आलिशान वाहनं आणि पदामुळे मिळणारा मान-सन्मान काही काळ बाजूला ठेवला. चेहरा आणि पेहराव बदलून ते सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे घाटकोपरच्या रस्त्यावर उतरले. काही तास त्यांनी रस्त्यावरच घालवत लोकांकडून मदत मागितली.
जैन गुरूंच्या सल्ल्यानंतर घेतला निर्णय
पराग शाह यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या जैन आध्यात्मिक गुरू नम्रमुनी यांनी त्यांना हा अनुभव घेण्याचा सल्ला दिला होता. पैसा, पद आणि राजकीय ओळख नसताना एखाद्या व्यक्तीकडे समाजाचा दृष्टिकोन कसा असतो, हे स्वतः अनुभवावे, असा या प्रयोगामागील हेतू होता.भिकाऱ्याच्या वेशात असल्याने रस्त्यावर भेटलेल्या बहुतांश नागरिकांना ते आमदार असल्याची कल्पना आली नाही. काहींनी त्यांना पैसे देऊन मदत केली, तर एका समोसे विक्रेत्याने पैसे न घेता त्यांना समोसा दिला. शाह यांनी मिळालेलं अन्न स्वीकारत रस्त्याच्या कडेला बसून काही वेळ घालवला.
‘मान-सन्मान बाजूला ठेवल्यावर वेगळं वास्तव दिसतं’
या अनुभवाबाबत पराग शाह यांनी सांगितले की, आमदार म्हणून आपल्याला भेटण्यासाठी लोक रांगा लावतात. मात्र, पद आणि ओळख बाजूला ठेवल्यानंतर लोकांचा प्रतिसाद पूर्णपणे वेगळा असतो. भिक्षा मागण्यासाठी ज्यांच्यासमोर आपण उभे राहिलो, ते त्या क्षणी आपल्यापेक्षा मोठे झाल्याची भावना निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.या प्रयोगातून केवळ भिक्षा मागण्याचा अनुभव नव्हे, तर माणुसकी, सामाजिक दृष्टिकोन आणि पद-प्रतिष्ठेचा लोकांच्या वागणुकीवर होणारा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न केल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.
त्याच ठिकाणी पुन्हा आमदार म्हणून भेट
विशेष म्हणजे, भिकाऱ्याच्या वेशातील प्रयोगानंतर पराग शाह यांनी पुन्हा आपला नेहमीचा पेहराव केला आणि त्याच परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. ओळख आणि पद समोर असताना आणि ती पूर्णपणे लपवून ठेवल्यानंतर लोकांचा प्रतिसाद कसा बदलतो, याची तुलना करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.या अनोख्या प्रयोगामुळे पराग शाह यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. काहीजण त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत आहेत, तर काहीजण याकडे सामाजिक प्रयोग म्हणून पाहत आहेत.
कोण आहेत पराग शाह?
पराग शाह हे मुंबईतील घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत. राजकारणासोबतच ते रिअल इस्टेट व्यवसायातही सक्रिय आहेत. २०१७ मध्ये ते मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी घाटकोपर पूर्वमधून विधानसभा निवडणूक जिंकली.२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्रानुसार, पराग शाह यांनी ३,३८३.०६ कोटी रुपयांची एकूण संपत्ती जाहीर केली होती. २०१९ मध्ये त्यांनी जाहीर केलेली संपत्ती ५५०.६२ कोटी रुपये होती.त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत लोकप्रतिनिधींमध्ये नाव असलेल्या पराग शाह यांनी अचानक भिकाऱ्याचा वेश धारण करून रस्त्यावर भिक्षा मागितल्याने त्यांच्या या प्रयोगाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.