पुणे : श्री शिव छत्रपती मित्र मंडळातर्फे स्व. इंद्राणी बालन यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरांचा शुभारंभ मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी जेधे मारुती मंदिर, पानघंटी चौकाजवळ, गुरुवार पेठ, पुणे येथे झाला. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान (आळंदी) चे विश्वस्त एड.राजेंद्र उमाप,लायन्स क्लब ऑफ पुना आय फाउंडेशन चे उपाध्यक्ष राजेंद्र मुछाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.लायन्स क्लब ऑफ पुणे फोर्ट आणि लायन्स क्लब ऑफ पुना आय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाआरोग्य गणेशोत्सव २०२६’ अंतर्गत या आरोग्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.
दि. १५ ते २२ सप्टेंबरदरम्यान विविध वैद्यकीय तपासण्या आणि आरोग्यविषयक सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कान्होजी जेधे, खजिनदार बलराज वाडेकर, उपाध्यक्ष प्रतीक खोपडे, कार्याध्यक्ष निरंजन सोमवंशी,जयराज वाडेकर यांनी केले आहे.श्री शिव छत्रपती मित्र मंडळ १३५ व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी हिमोग्लोबिन, शुगर आणि रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी मोफत हाडांची तपासणी म्हणजेच बोन डेन्सिटी तपासणी केली जाणार आहे. शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, रक्तदात्यांसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी मोफत दंत चिकित्सा शिबिर होणार आहे. रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी महिलांसाठी मोफत स्तनआरोग्य पूर्व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सोमवार, दि. २१ आणि मंगळवार, दि. २२ सप्टेंबर रोजी मोफत आयुष्मान भारत कार्ड योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.याशिवाय नियम व अटी लागू असलेल्या मोफत डायलेसिस योजनेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सर्व शिबिरे सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत जेधे मारुती मंदिर, पानघंटी चौकाजवळ, गुरुवार पेठ, पुणे येथे होणार आहेत.