पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (स्पुक्टो) ही सन १९७४ पासून विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकांच्या शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक हितासाठी तसेच उच्च शिक्षणाच्या गुणवत्तावर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेली संघटना आहे. पन्नास वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास केवळ कालखंडाचा प्रवास नसून, विचार, संघटन, संघर्ष, संवाद आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा प्रेरणादायी इतिहास आहे. या वाटचालीत अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांनी आपले अमूल्य योगदान दिले. त्यांच्या कार्याचे स्मरण, त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता आणि पुढील वाटचालीसाठी नवा संकल्प करण्याच्या भावनेतून स्पुक्टोच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सुवर्णमहोत्सव समारंभ, कृतज्ञता सोहळा आणि संघटनेच्या गेल्या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या 'सुवर्णसंचित' स्मरणिकेचा प्रकाशन समारंभ रविवार दि. २० सप्टेंबर,२०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता न्यू, आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय ,अहिल्यानगर. येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी दिली.
या कार्यक्रमास राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक, डॉ. शैलेंद्र देवळाणकर प्रमुख पाहुणे तर प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी व ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. सी. आर. सदासिवन उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय प्राध्यापक संघटनेचे माजी महासचिव प्रो. डॉ. अशोक बर्मन असणार आहेत. यावेळी 'सुवर्णसंचित' चे संपादक डॉ. एस. पी. लवांडे, संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. के. एल. गिरमकर, स्पुक्टोचे अध्यक्ष प्रा. प्रकाश वाळुंज ,सरचिटणीस प्रा. डॉ. प्रवीण ताटे-देशमुख उपस्थित राहणार आहेत.