मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्रातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उत्तर अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत दोन्ही देशांच्या नौदलाच्या जहाजांमध्ये धडक झाल्याची माहिती आहे. या घटनेत मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नसले, तरी त्यानंतर भारताने राजनैतिक पातळीवर पाकिस्तानकडे तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाचे एक युद्धनौके नियमित देखरेख मोहिमेवर असताना पाकिस्तानी नौदलाचे जहाज वेगाने भारतीय जहाजाच्या दिशेने आले. त्यानंतर पाकिस्तानी जहाजाने मार्ग बदलल्याने दोन्ही जहाजांमधील अंतर कमी झाले आणि अखेर त्यांची धडक झाली, असा भारताचा दावा आहे.
या घटनेत सहभागी पाकिस्तानी जहाज पीएनएस हुनैन असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. हे यारमौक श्रेणीतील सागरी गस्ती जहाज असून, समुद्रातील देखरेख आणि गस्तीसाठी त्याचा वापर केला जातो. मात्र, धडकेत सहभागी भारतीय नौदलाच्या जहाजाची ओळख अद्याप अधिकृतपणे समोर आलेली नाही. दुर्घटनेचे अचूक ठिकाणही जाहीर करण्यात आलेले नाही.
भारताचा पाकिस्तानवर गंभीर आक्षेप
घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगाच्या प्रभारी दूतांना पाचारण केले. पाकिस्तानी नौदलाच्या जहाजाची हालचाल असुरक्षित आणि अव्यावसायिक असल्याचे सांगत भारताने निषेध नोंदवला.
समुद्रात कार्यरत असलेल्या लष्करी जहाजांनी अत्यंत सावधगिरीने हालचाली कराव्यात आणि भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या करारांचे पालन करावे, अशी भूमिका भारताने घेतली आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
1991च्या कराराचा दिला दाखला
या प्रकरणात भारताने एप्रिल 1991 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या करारातील कलम 10 चा संदर्भ दिला आहे. या करारात दोन्ही देशांच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांनी आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याबाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत.
कलम 10 नुसार दोन्ही देशांच्या युद्धनौका आणि पाणबुड्या आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत एकमेकांच्या 3 नॉटिकल मैलांपेक्षा (सुमारे 5.56 किलोमीटर) कमी अंतरावर येऊ नयेत, अशी तरतूद असल्याचे भारताने म्हटले आहे. समुद्रात दोन्ही देशांच्या नौदलाची जहाजे जवळच्या भागात कार्यरत असल्याने या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे मानले जाते.या करारामध्ये केवळ सागरी अंतरासंबंधी नियम नसून लष्करी कवायती आणि सैन्याच्या हालचालींबाबत पूर्वसूचना देण्यासह अन्य बाबींचाही समावेश आहे.
इस्लामाबादमध्येही निषेध नोंदवण्याच्या सूचना
नवी दिल्लीतील कारवाईनंतर भारताने इस्लामाबादमधील आपल्या चार्ज डी'अफेअर्सना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे या घटनेबाबत भारताचा निषेध नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत.दोन्ही देशांच्या लष्करी जहाजांनी समुद्रात आंतरराष्ट्रीय नियम आणि द्विपक्षीय करारांचे पालन करून कारवाई करावी, असा भारताचा आग्रह आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांच्या नौदलामधील सागरी हालचाली पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
2011 मध्येही झाली होती अशीच धडक
भारत आणि पाकिस्तानच्या नौदलाच्या जहाजांमध्ये यापूर्वीही समुद्रात धडक झाल्याची घटना घडली आहे. 2011 मध्ये भारतीय नौदलाचे आयएनएस डोगवारी आणि पाकिस्तान नौदलाचे पीएनएस बाबर यांच्यात टक्कर झाली होती.त्या वेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या जहाजांनी धोकादायक पद्धतीने हालचाली केल्याचे आरोप केले होते. भारताने त्यावेळीही 1991च्या करारातील कलम 10चा संदर्भ देत पाकिस्तानकडे निषेध नोंदवला होता.सध्याच्या घटनेनंतर भारताने पुन्हा एकदा सागरी सुरक्षितता, युद्धनौकांमधील अंतर आणि द्विपक्षीय करारांचे पालन या मुद्द्यांवर पाकिस्तानसमोर आपला आक्षेप मांडला आहे. दरम्यान, धडकेचे नेमके कारण आणि स