पुणे : विद्यार्थ्यांना संशोधन पद्धतीचा ओळख व्हावी या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे प्रा. डॉ. शैलेंद्र खरात (राज्यशास्त्र विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) यांच्या ‘संशोधन पद्धतींची ओळख’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे सहयोगी अधिष्ठाता व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी महाविद्यालय परीक्षा अधिकारी डॉ. सुभाष वाव्हळ, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भरत राठोड, भूगोल विभाग प्रमुख डॉ. रमाकांत कसपटे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र वडशिंगकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. शैलेंद्र खरात यांनी संशोधन पद्धतीची ओळख या विषयावर मार्गदर्शन करताना सर्वप्रथम संशोधन प्रकल्पाची निवड कशी करावी, त्यासाठी पुरक संदर्भ साहित्याचा आढावा घेण्याची गरज आहे असे सांगितले. त्यानंतर संशोधन साहित्यातून विद्यार्थ्याला संशोधनातील उणीवा, गरज आणि आवश्यकता समजून येते. संशोधन प्रश्नाला अनुसरून संशोधनाची गृहितके व उद्दिष्टे निश्चित करता येतील. संशोधनाची गृहितके सिद्ध करण्यासाठी सामाजिक शास्त्रातील कोणती पद्धत पुरेशी पुरक ठरते? त्यावर आधारित संशोधन प्रकल्पासाठी उपयुक्त संशोधन पद्धत ठरवता येईल. सामाजिक शास्त्रामध्ये संशोधनाच्या अनेक पद्धती विकसित झालेल्या असल्या तरी प्रा. खरात यांनी चार पद्धतीवर अधिक भर देऊन व्याख्यानाचा शेवट केला. त्यांच्या मते पहिली पद्धत म्हणजे गुणात्मक पद्धत, दुसरी मात्रात्मक व संख्यात्मक पद्धत, तिसरी पुराभिलेख पद्धत आणि चौथी म्हणजे मिश्र पद्धत. याशिवात वर्तनवादी क्रांतीनंतर अनुभववादावर आधारित अनुभवजन्य पद्धत विकसित झाली. ज्यामध्ये संशोधनाचे क्षेत्र, नमुना निवड, निरीक्षण, विश्लेषण, निष्कर्ष ठामपणे मांडता येतील. राज्यशास्त्राचे प्राध्यापक मुख्यत: निवडणुकीचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत वापरत असतात. ज्यामुळे अचूक अंदाज आकडेवारीच्या आधारे मांडता येते. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात याच पद्धतीवर भर दिल्याचे मत प्रा. खरात यांनी मांडले.
अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील बदल व संशोधन पद्धतीवर असणारा भर व त्याचे महत्व यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच फिल्ड प्रोजेक्ट, संशोधन प्रकल्प लिहिताना आवश्यक असणारी माहिती व संशोधन पद्धती विद्यार्थ्यांना आजच्या व्याख्यानातून मिळेल व अशा व्याख्यानातूनच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टी रुजू शकते. असा विश्वास प्राचार्य डॉ. पंडित शेळके व्यक्त केला. कार्यक्रमास १०० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यकमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भरत राठोड यांनी मांडले तर सुत्रसंचालन डॉ. राजेंद्र भोईवार यांनी केले. कार्यक्रमातील पाहुणे आणि उपस्थितांचे आभार प्रा. प्राजक्ता कुंभार यांनी मानले